Published On : Sat, Aug 28th, 2021

चंद्रपूर शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम सुरु

चंद्रपूर : चंद्रपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे डुकरे दिसून येत आहेत. शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट रोजी श्यामनगर परिसरातील शहीद भगतसिंग चौकात डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, शहरातील मोकाट जनावरे जिल्याबाहेर सोडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 453 अंतर्गत स्वच्छता विषयक तरतुदी मधील प्रकरण 14 मधील कलम 22 अंतर्गत उपरोक्त कारवाई करण्यात येत आहे. शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरे मोकाट फिरत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणत आहेत. मोकाट डुकरे शहरातील रस्त्यावर कुठेही मलमूत्र विसर्जन करून साथरोग प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे मनपाने तातडीने कारवाई सुरु केली आहे.

शहरांमध्ये अनेकांनी बेकायदेशीररित्या वराहपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी आपली डुकरे निर्जनस्थळी, वस्तीविरहित ठिकाणी बंदिस्त करून ठेवावेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट डुकरे फिरताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मोकाट डुकरे फिरणार नाही, याची विशेष काळजी वराहपालन व्यावसायिकांनी स्वतः घ्यावी अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, ही कारवाई तीन दिवसाच्या आत करून आपल्या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशा सूचना मनपाचे अतिरिक्त आयुक्त पालीवाल यांनी दिल्या आहेत.