Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 8th, 2018

  मोमीनपुरा: नागपुरात मनपाच्या पथकावर दगडफेक

  नागपूर : मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात तणावाच्या वातावरणात येथील अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला.

  पथकाने ७० अतिक्रमण हटविले. यात शेड, अनधिकृत बांधकाम, ओटे आदींचा समावेश आहे. पोलीस बंदोबस्तात पथकाने सुरुवातीला भगावघर चौकातून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर मोमीनपुरा गेटमधून मोमीनपुरा चौक, एमएलए कॅन्टीन रोड व पुढे जामा मशीदपर्यंतच्या मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले. अन्सारनगर रोड येथील इरोज मेडिकल स्टोर्सलगतच्या बोळीतील टिनाच्या कुंपणावरून वाद होता. येथील टिन हटविण्यात आले.

  कारवाईला विरोध करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु अन्सारनगर येथे पथक पोहचल्यानंतर लोकांनी एनआयटीचे ले-आऊ ट असल्याचा दावा करीत काही जणांनी कारवाईला विरोध दर्शविला. परंतु पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरूच ठेवली. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजय कांबळे, मंजूर शाह, नितीन मंथनवार, जमशेद आली, संजय शिंगणे, शरद इरपाते यांच्यासह पथकाने केली.

  पथकातील अधिकाऱ्यांना धमक्या

  अंसारनगर रोडवर पथकातील कर्मचाऱ्यांना निर्देश देणाऱ्या अधिकाऱ्यांशी एका अतिक्रमणधारकाने वाद घातला. अधिकाऱ्याला बघून घेण्याची त्याने धमकी दिली.

  अखेर अतिक्रमण हटविले

  अन्सारनगर येथील रोड ४० फुटाचा होता. परंतु रोडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने हा रोड २० फुटाचा झाला. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाद निर्माण होतात. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी होती. अनेकदा यासंदर्भात तक्रारी केल्या. अनेक वर्षांनंतर अखेर मंगळवारी या भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच हॉटेल व्यावसायिकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.

  तीन अनधिकृत धार्मिक स्थळे तोडली

  सतरंजीपुरा झोनमधील विविध भागातील तीन अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्यात आले. यात बिनाकी मंगळवारी येथील सोनारटोली, किनखेडे ले-आऊ ट व पोहाओळ इतवारी येथील धार्मिक स्थळांचा समावेश आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145