नागपूर : भारताच्या वाढत्या साखेबद्दल भीती निर्माण झाल्याने काही देश भारताला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे लगावला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टक्के टॅरिफच्या संदर्भात बोलताना भागवत यांनी “भारत मोठं झालं तर आमचं काय होईल, या भीतीतून भारताला दाबण्याचे प्रयत्न होत आहेत” असे म्हटले.
भागवत ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ‘मी’ आणि ‘माझं’ या संकुचित विचारसरणीतून जगातील अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “जेव्हा आपण ‘मी’ आणि ‘माझं’ याऐवजी ‘आपण’ आणि ‘आपलं’ असा विचार करतो, तेव्हा समस्या सुटतात. जगाला आज खर्या समाधानाची गरज आहे, पण पाश्चात्त्य देश ‘मी’पुरतेच अडकले आहेत.”
आपले विचार स्पष्ट करताना भागवत यांनी एका प्रसंगाचा दाखला दिला. “एका वाटेवर विषारी साप असतो, पण तथागतांच्या पावलांपाशी तो शांतपणे डोके ठेवतो. यावरून कळते की प्रत्येक साप विषारी नसतो, आणि विषारी सापही केवळ त्रास दिल्यास दंश करतो,” असे ते म्हणाले.
भागवत पुढे म्हणाले, स्थितीनुसार लोक माझ्याबद्दल चांगले बोलतात, पण ती स्थिती आहे. संघाने मला सरसंघचालक केले म्हणून माझ्याबद्दल आदर आहे. हे दुसऱ्या कोणाबाबत घडले असते, तर त्याबाबत लोक तेच म्हणाले असते. हे सत्य नाही, तर बदलत राहणारं आहे.
भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना भागवत म्हणाले की, भारत जगाला दिलासा आणि समाधान द्यायचा इच्छितो. इतर देश श्रीमंतीसाठी लूटमार, हल्ले करून स्वतःला मोठं करतात. पण भारत जगाला मार्ग दाखवण्यासाठी मोठा होऊ इच्छितो. त्यामुळे भारताचे सामर्थ्य हे जगाच्या कल्याणासाठी आहे.