मुंबई : राज्यात आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. सर्व राजकीय पक्ष युद्ध स्तरावर तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज अनेक वर्तमान पत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असे शीर्षक देण्यात आले आहे. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.
वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४% जनता भाजपा आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवली असल्याचे म्हटले आहे. तसेच या जाहिरात शिवसेना पक्षाचे चिन्ह आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे.
दरम्यान एकंदरीत ही जाहिरात पाहता शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना बॅकफूटवर टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.