Published On : Tue, Jun 26th, 2018

मूळ प्रश्नांना झाकण्यासाठी आणीबाणीची आठवण झाली – शरद पवार

Advertisement

पुणे : चार वर्षात निर्माण झालेल्या मूळ प्रश्नांना झाकण्यासाठी आता ४३ वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अाणीबाणीची आठवण झाली आहे. असा टाेला शरद पवार यांनी आज लगावला. काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ४३ वर्षांपूर्वी म्हणजेच २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लादल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात इंदिरा गांधींची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी केली होती. त्यांच्या या टीकेनंतर बाेलताना पवारांनी वरील टाेला लगावला.

पुणे येथे अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमीच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंती समारंभात बाेलताना शरद पवार म्हणाले की, गेल्या चार वर्षात अालेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अाता 43 वर्षांनंतर त्यांना अाणीबाणी अाठवत अाहे, वाजपेयींच्या पाच वर्षात अाणबाणीची कधी अाठवण अाली नव्हती असेही पवार यावेळी म्हणाले.

तसेच, अधिकाराचा गैरवापर करत नियमांना डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात ‘MPID’ कलमाखाली बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक केल्यानंतर पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठे यांना अटक करताना पाेलीसांनी अाततायीपणा दाखवला असून पुण्याचे पाेलीस म्हणजे कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण आहे. मात्र आम्ही सर्व मराठेंच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

संपूर्ण बॅंकींग प्रणालीवर लक्ष ठेवण्याचा कायदेशीर अधिकार रिझर्व बॅंक अाॅफ इंडियाला अाहे. रिझर्व बॅंकेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका अाजपर्यंत काेणी घेतली नाही. पुण्याच्या पाेलीसांनी अारबीअायला न कळवता मराठे यांना अटक केल्याने पुण्याचे पाेलीस अधिक जागरुक दिसत अाहेत. या सर्व प्रकारावरुन कायदा हातात घेऊन कायद्याचा गैरवापर करण्याचे उदाहरण पुणे पाेलीसांनी घालून दिले अाहे.

दरम्यान, एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक होते. पण पोलिसांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनाही अंधारात ठेवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांना माहिती न देता पोलीस खात्याला हाताशी धरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक करण्यामागे राजकारणातील देवेंद्र फडणवीस विरोधी गटाचा हात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.