Published On : Thu, Nov 1st, 2018

मोदी जगभर फिरतात पण शेतक-यांना भेटत नाहीतः गुलाम नबी आझाद

औंगाबाद : नरेंद्र मोदींना भारतातील सर्वसामान्य जनतेची अजिबात काळजी राहिली नाही. मोदी जगभर फिरतात मात्र आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटायला त्यांना वेळ नाही अशी घणाघाती टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. ते काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याच्या सांगता सभेमध्ये बोलत होते.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याची सांगता आज मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावरील विराट जाहीर सभेने झाली. यावेळी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. अब्दुल सत्तार, आ. अमरनाथ राजूरकर, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी आमदार औरंगाबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन काळे, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष समीर सत्तार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आझाद यांनी भाजप सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले की मोदी अधिकाधिक काळ परदेशात असतात. निवडणूक आली की प्रचारासाठी ते देशात फिरताना दिसतात. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी लाठ्या-काठ्या, गोळ्या वापरून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मोदी इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांचा दुरुपयोग करून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी फक्त दोन ते तीन लोकांसाठीच देश चालवत आहेत. मोदी देशात हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. मोदींनी शेतकरी, विद्यार्थी, तरूण, महिला, व्यापारी यांना खोटे बोलून फसवले. या खोटारड्या सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे काश्मिरात संपलेला दहशतवाद पुन्हा वाढीस लागला आहे. या सरकारच्या काळात काश्मीरात सर्वात जास्त दहशतवादी हल्ले झाले. मोदींनी देशाला धोका दिला आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या सभेला मार्गदर्शन करताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राफेल विमान खरेदी घोटाळ्यामुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. आपल्या उद्योगपती मित्राच्या फायद्यासाठी मोदी देशाचे नुकसान करत आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयाने नुकसान झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोक-या गेल्या. नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही उलटपक्षी महागाई प्रचंड वाढली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व करांच्या बोझ्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे यातून मिळणारा पैसा मोदींनी आपल्या मित्रांच्या खिशात घातला. मोदींचे सरकार संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय संपवण्याचा प्रयत्न करित आहे. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचले नाही तर अधिक बुरे दिन येतील असे खर्गे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारचा जोरदार समार घेतला. ते म्हणाले की, गेल्या चार साडेचार वर्षात भाजपने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आपल्या कामाच्या जोरावर जनतपुढे जाऊ मते मागण्याची सोय राहिली नाही.

म्हणूनच भाजप पुन्हा राममंदिराचा मुद्दा काढत आहे. भाजपने राजकारणासाठी रामाचा वापर थांबवावा. असे सांगून सरकार तुमचेच आहे तुम्ही राममंदिराची डेट आणि राफेलचा रेट सांगा अशी मागणी केली. केंद्रातील आणि राज्यातील सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. काँग्रेसने देश घडवण्याचे काम केले मात्र भाजप देश तोडण्याचे काम करत आहे. राज्यातले सरकार आंधळे आणि बहिरे आहे. या सरकारला जनतेचे दुःख दिसत नाही. काँग्रेस व मित्रपक्षांनी संघर्ष यात्रा काढली तेव्हा सरकारला शेतक-यांच्या आर्थिक दुरावस्था दिसली. काँग्रेसच्या दबावामुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकार जाहीर करत नव्हते. काँग्रेस पक्षाने काढलेल्या काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला असे खा. चव्हाण म्हणाले.

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा शेतकरी, कष्टकरी, तरूण, महिला, विद्यार्थी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने जनसंघर्षाची मशाल हाती घेतली आहे. राज्यातील नाकर्ते भाजप शिवसेनेचे सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.