Published On : Tue, Jun 5th, 2018

मोदी व शहांनी देशाला काँग्रेसमुक्त न करता भाजपला संघमुक्त केले – उद्धव ठाकरे

मुंबई : २०१४ साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचारदरम्यान मोदी व शहा यांनी देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा प्रण घेतला होता. मात्र त्यांनी देशाला काँग्रेसमुक्त करण्याआधी भाजपला संघमुक्त केले. ही मोठीच कमाई आहे, अशी मिश्किल टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहायांच्यावर केली आहे. प्रणव मुखर्जींसारख्या एका विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या माणसाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, अशी भूमिका काँग्रेसच्या जयराम रमेश वगैरे मंडळींनी घेतली त्यांना संघ कळला नाही. संघसुद्धा धर्मनिरपेक्षच आहे असं म्हटलंय. संघाचे प्रिय नितीन गडकरी व शरद पवार हे पुण्यात एका हॉटेलात भेटले व भंडारा–गोंदिया लोकसभा निकालाचे पेढे दोघांनी एकमेकांना भरवले. प्रणव मुखर्जीदेखील पेढे खातील व निघून जातील. उद्या शरद पवारही संघ मंचावर जातील. संघाने दरवाजे उघडले हे बरे झाले असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आजचा सामना संपादकीय…

प्रणव मुखर्जी हे नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास जात आहेत व त्यावरून अकारण वादंग माजविण्यात आला. काँग्रेसच्या मूर्खपणाचे हे पहिले आणि महत्त्वाचे लक्षण आहे. मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर असा कोणता पहाड कोसळणार आहे? प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात जे काहूर माजले त्यावर मुखर्जी यांनी फक्त एका वाक्यात खुलासा केला. ‘मला जे काही बोलायचे आहे ते आता नागपुरातच बोलेन.’ काँगेस तसेच इतर मंडळींनाही हीच सावध भूमिका घेता आली असती. प्रणव मुखर्जी हे संघ व्यासपीठावर जाऊन काय भूमिका घेतात, बोलतात ते पाहू व मगच काय ते बोलू. असे काँगेस पक्ष सांगू शकला असता, पण त्या पक्षातील काही विटाळ गेलेल्या विचारवंतांनी अकारण काहूर माजवले आहे. संघाच्या मंचावर जाणे म्हणजे पाप नाही. काँग्रेस पक्ष सत्ता स्थापनेसाठी केरळातील मुस्लिम लीगसारख्या पक्षाशी हातमिळवणी करू शकतो. मनमोहन सिंग यांच्या ‘यूपीए’ सरकारात मुस्लिम लीगचा प्रतिनिधी होताच. तेव्हा आज मुखर्जी यांना संघ मंचावर जाण्यापासून रोखणाऱया बेगडी मंडळींनी मुस्लिम लीगला मनमोहन सरकारात स्थान देऊ नये असे त्यावेळी का सांगितले नाही? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मुस्लिम लीग या दोन्ही टोकाच्या विचारसरणी आहेत. मुस्लिम लीग हा फुटीरतावादी धर्मांध पक्ष आहे. त्याच्या नेमका विरोधी ‘संघ’ आहे. संघ हिंदुत्ववादी आहे, पण त्यांच्या राष्ट्रवादावर सतत शंका घेतली जाते हासुद्धा मूर्खपणाच आहे.

संघाच्या पोटातूनच भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला, पण गेल्या चारेक वर्षांपासून पोरगं बापाला विचारीत नसल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत. प्रश्न इतकाच आहे की, संघाच्या व्यासपीठावर गेल्याने नक्की कोणाचे सोवळे उतरणार आहे? संघाने त्यांचे हिंदुत्व पूर्वीइतके जहाल ठेवले नाही व त्यांना एक सर्वसमावेशक असा नवा प्रवाह निर्माण करायचा आहे. ताजी बातमी अशी आहे की, संघाने देशभरात ‘इफ्तार पाटर्य़ा’देखील सुरू केल्या आहेत. भारतीय जनता पक्षानेही डोक्यावर ‘फर कॅप’ घालून इफ्तारची फळं आणि खजूर खायला केव्हाच सुरुवात केली. संघात मुसलमानांनी यावे अशी नवी तयारी सुरू आहे.

त्यामुळे सोवळय़ातून बाहेर पडलेल्या संघाच्या व्यासपीठावर प्रणव मुखर्जी गेले तर इतके धाय मोकलून रडण्याचे कारण नाही. संघाची नवी वाटचाल पाहता ते जामा मशिदीचे इमाम, व्हॅटिकन सिटीचे पोप महाराज यांनाही विचारमंथनासाठी आमंत्रित करू शकतात. सहिष्णुता हे हिंदुत्वाचे दुसरे नाव आहे व आम्ही मनातल्या मनात स्वतःचा कोंडमारा करून घेत नाही. जे आपल्या विचारांचे नाहीत अशा महनीय व्यक्तींचे विचार समजून घेतले पाहिजे. सुरुवातीच्या काळात मुंबईत शिवसेना व कम्युनिस्टांत संघर्ष झाला, तोसुद्धा एक वैचारिक झगडा होता, पण शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनात थोर कम्युनिस्ट नेते भाई श्रीपाद अमृत डांगे हे महनीय वक्ते म्हणून हजर होते. जसे डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर आले तसे प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जात आहेत. इथे एक स्पष्ट केले पाहिजे की, प्रणव मुखर्जी यांना संघाच्या व्यासपीठावर जाण्याची भूक नसून मुखर्जीसारख्यांनी संघ मंचावर येणे ही आता संघाची गरज आहे. नव्या राजकीय रचनेत मोदी व त्यांच्या मंडळींनी संघाला चार हात लांबच ठेवले आहे.

२०१४ ची निवडणूक भाजपने संघाचे प्रचारक व स्वयंसेवकांच्या मेहनतीवर जिंकली असे सांगितले गेले, पण ही निवडणूक नरेंद्र मोदी यांचा ‘चेहरा’ लोकप्रिय असल्याने जिंकली. अन्यथा विजय सोपा नव्हता, असे मोदीभक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे संघ व भाजपातील मोदीभक्त अशी सरळ दुफळी पडली आहे. मोदी यांनी संघास अवास्तव महत्त्व द्यायचे नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने काही ठिकाणी ओवेसी व त्यांच्या एमआयएमशी छुपी युती केली आहे, तर कश्मीरात भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती करून सरकार बनवले. असे सरकार जन्मास घालण्यात संघाचे राम माधव, विनय सहस्त्र्ाबुद्धे ही महत्त्वाची मंडळी पुढे होती. या सगळय़ांचा गाभा असा की प्रणव मुखर्जी हे एका ‘सेक्युलर’ अशा ‘नरम’ हिंदुत्वाचा विचार धारण करणाऱया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जात आहेत. हा संघ यापुढे भाजपला किती राजकीय मदत करू शकेल ते सांगता येत नाही. कारण निवडणूक जिंकण्यासाठी संघाचे कष्टाळू कार्यकर्ते नकोत, तर सत्ता, पैसा व साम, दाम, दंड, भेद नीतीच उपयोगी ठरेल हे संघ विचाराच्या भाजपने ठरवले आहे आणि ते अनेक ठिकाणी कृतीने दाखवूनही दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाला काँग्रेसमुक्त करण्याआधी भाजपला संघमुक्त केले. ही मोठीच कमाई आहे. संघाचे प्रिय नितीन गडकरी व शरद पवार हे पुण्यात एका हॉटेलात भेटले व भंडारा-गोंदिया लोकसभा निकालाचे पेढे दोघांनी एकमेकांना भरवले. प्रणव मुखर्जीदेखील पेढे खातील व निघून जातील. उद्या शरद पवारही संघ मंचावर जातील. संघाने दरवाजे उघडले हे बरे झाले. प्रणव मुखर्जींसारख्या एका विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या माणसाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, अशी भूमिका काँग्रेसच्या जयराम रमेश वगैरे मंडळींनी घेतली त्यांना संघ कळला नाही. संघसुद्धा धर्मनिरपेक्षच आहे. असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.