Published On : Sat, Aug 18th, 2018

नागपूरच्या कुख्यात सुमित ठाकूरसह टोळीतील गुंडांवर मोक्का

Advertisement

 

नागपूर : शहरातील कुख्यात गुंड सुमित राजकुमार ठाकूर (रा. प्रेरणा कॉलनी, गिट्टीखदान) याच्यासह त्याच्या टोळीतील एकूण १३ गुंडांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम १९९९ अन्वये मोक्का लावला आहे.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय नागपुरात रुजू झाल्यानंतर त्यांनी सुमित ठाकूर याला दोन दिवसात हुडकून हजर करा अन्यथा मीच रस्त्यावर उतरेन, असा इशारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर सुमितला पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या प्रेयसीच्या घरातून अटक केली होती, हे विशेष!

कुख्यात सुमित आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध हत्या, सुपारी देऊन हत्येचा प्रयत्न करणे, लुटमार करणे, धमक्या देणे आदी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही ते जुमानत नसल्याचे पाहून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सुमित आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.

सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, बी. जी. गायकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, परिमंडळ -२ चे उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोक्काचा अहवाल बनविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच गुन्ह्यांची जमवाजमव केली. त्यानुसार कुख्यात सुमित ठाकूर तसेच त्याच्या टोळीतील सराईत गुंड नौशाद पीर मोहम्मद खान (मोमीनपुरा), मोहम्मद इरफान ऊर्फ बंदुकीयाँ सामी सिद्दीकी (रा. जाफरनगर), सूर्यप्रकाश ऊर्फ पिंकू हरिप्रसाद तिवारी (रा. सुरेंद्रगड), मनोज ऊर्फ मोन्या प्रकाश शिंदे (रा. बरडे लेआऊट बोरगाव), विनय ऊर्फ लाला राजेंदप्रसाद पांडे (रा. अनंतनगर राठोड लेआऊट), उजैर ऊर्फ उर्ज्जी परवेज अब्दुल खालीद (रा. महेशनगर) पीयूष गजानन वानखेडे (रा. फ्रेण्डस् कॉलनी), जुनेद ऊर्फ जिशान गुलशेर खान (रा. महेशनगर गिट्टीखदान), अमित ऊर्फ अण्णा नरेंद्रकुमार स्वामी (रा. महेंद्रनगर), वजूल ऊर्फ सॅम बिष्ट (रा. गिट्टीखदान), सय्यद शाहनवाज अली (रा. विनोबा भावेनगर, यशोधरानगर) आणि नीलेश अशोक उके (रा. रविनगर) या १३ जणांविरुद्ध पोलिसांनी १६ आॅगस्टला मोक्का लावला.

डॉ. भूषणकुमार उपाध्याय येथे १ आॅगस्टला पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. येथे येतायेताच त्यांनी गुन्हेगारांची गय करायची नाही, असा इशारा शहर पोलीस दलाला दिला. या पार्श्वभूमीवर, कुख्यात सुमीत ठाकूर आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोक्कासारखी कडक कारवाई करून डॉ. उपाध्याय यांनी शहरातील गुन्हेगारांना एकप्रकारे सज्जड दमच दिला आहे.