Published On : Fri, Nov 10th, 2017

राज ठाकरे ‘जमिनीवर’…

गेल्या काही निवडणुकांमध्ये बसलेले पराभवाचे धक्के आणि पक्षाच्या शिलेदारांनी दिलेले ‘नाराजी’नामे याची गंभीर दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज यांनी नाशिकमधील मनसैनिकांशी चक्क जमिनीवर बसून चर्चा केली.

महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यातील अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. अलीकडेच मुंबईतील नगरसेवकांनीही मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. एकामागून एक शिलेदार ‘साथ’ सोडून गेले. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जाते.

ही नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षाला आलेली मरगळ झटकून नवी उभारी देण्यासाठी राज येत्या काळात राज्यभर दौरे करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते नाशिकच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास आठ महिन्यांनी त्यांनी नाशिकला भेट दिली आहे. नाशिकला पोहोचल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे ‘मनसे’ स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राज आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. जमिनीवर बसून त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, या दौऱ्यात ते समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येथील विश्रामगृहात कल्याण, शहापूर, इगतपुरी येथील शेतकरी त्यांनी भेट घेतील.