
अमरावती : भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता त्यांच्या पती व आमदार रवि राणा यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रहार संघटनेचा कार्यकर्ता प्रशांत डिक्कर याने सोशल मीडियावरून ही उघड धमकी दिली असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राणा समर्थकांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
रवि राणा आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यातील वैर हे काही नवीन नाही. दोन्ही नेते अनेकदा एकमेकांवर तीव्र वक्तव्ये करत आले आहेत. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीदरम्यान कडू यांनी गठबंधन धर्म न पाळता उमेदवार उभा केल्यामुळे राणांचा पराभव झाला आणि त्यानंतर हे वैर आणखी वाढले.
याच पार्श्वभूमीवर प्रहार कार्यकर्ता प्रशांत डिक्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत, “हंसियाने तुझं डोकं उडवीन” असे म्हणत आमदार राणांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला आणि त्यामुळे अमरावतीत खळबळ उडाली.
या प्रकरणावर स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते विनोद गुहे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रशांत डिक्कर फक्त माध्यमांत आणि सोशल मीडियावर झळकण्यासाठी हिंसाचाराची भाषा वापरत आहे. ही भाषा लोकशाहीची नव्हे, तर अराजकतेची आहे आणि समाजासाठी धोकादायक आहे. अशा भडकाऊ विधानांना कधीही सहन केले जाणार नाही. डिक्करविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”
गुहे यांनी पुढे डिक्करला थेट आव्हान दिलं, “जर त्याच्यात खरोखर हिंमत असेल, तर रवि राणांना हात लावून दाखवावा, मग त्याला स्वाभिमानी युवांची ताकद काय असते, ते कळेल.”
दरम्यान, राजापेठ पोलिसांनी या धमकीच्या प्रकरणाला गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर राणा समर्थकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून, अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे.








