Published On : Thu, Feb 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आमदार डॉ. परिणय फुके यांची महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती

Advertisement

मुंबई. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या (माफसू) कार्यकारी परिषदेवर विधानपरिषदेचे सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९६ मधील कलम १२ (२) (चौथा) अन्वये ही नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून याबाबतचा अधिकृत आदेश २९ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. कार्यकारी परिषद ही विद्यापीठाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. यामध्ये कुलगुरू, शासकीय प्रतिनिधी आणि नियुक्त सदस्यांचा समावेश होतो.

विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचा कार्यकाळ, विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच आर्थिक धोरणे ठरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन, विस्तार सेवा, अभ्यासक्रम विकास, पायाभूत सुविधा, पशुपालक व मत्स्यव्यवसायाशी संबंधित योजनांचे मार्गदर्शन आणि अंमलबजावणीत कार्यकारी परिषदेची निर्णायक भूमिका असते.

आमदार डॉ. परिणय फुके हे विदर्भातील सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक विषयांमध्ये सातत्याने सक्रिय आहेत. शेतकरी, पशुपालक, दुग्धव्यवसायिक व मत्स्यव्यवसायाशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन असून, विधिमंडळात त्यांनी वेळोवेळी या क्षेत्रातील समस्या व उपाययोजना प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांच्या या अनुभवाचा लाभ विद्यापीठाच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेला अधिक वेगवान करण्यात महत्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

आमदार डॉ. परिणय फुके यांची ही नियुक्ती २७ जुलै २०३० पर्यंत वैध राहणार आहे. या कालावधीत विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ, संशोधनाला चालना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच पशुपालक व मत्स्यव्यवसायिकांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या नियुक्तीमुळे विशेषतः विदर्भातील पशु व मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था, संशोधन केंद्रे आणि ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकरी घटकांना थेट लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.