सावनेर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सावनेरमध्ये भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली तिरंगा बाइक रॅली निघाली. देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते, तिरंग्यांची लाट रस्त्यांवर उसळली होती. पण या देशभक्तीच्या लाटेत वाहतूक नियम मात्र बुडाले!
या रॅलीत आमदार देशमुख हेल्मेटशिवाय ड्युटीवरील पोलिस अधिकाऱ्यांचीच मोटारसायकल चालवत रस्त्यावर दिसले. एवढेच नव्हे, तर बाइकवर स्टंट करतानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही बाइक एका ड्युटीवरील पोलिस अधिकाऱ्याची असून, त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या ताब्यातील सरकारी वाहन आमदारांना हेल्मेटशिवाय चालवू दिले.
रॅलीतील इतर अनेक सहभागींसुद्धा हेल्मेटचा विसर पडला होता. अशा प्रकारे संपूर्ण रॅलीत वाहतूक नियमांचा सर्रास भंग झाला.
या घटनेनंतर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली –
सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे वाहतूक नियम मोडण्याचा परवाना मिळतो का?
पोलिस अधिकाऱ्याने स्वतःचे वाहन हेल्मेटशिवाय चालवण्यासाठी दिले, त्याच्यावर काय कारवाई होणार?
राजकीय दिखावा महत्त्वाचा की नागरिकांची सुरक्षितता?
दरम्यान रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचे प्रदर्शन झाले, पण त्याचबरोबर कायद्याच्या पालनाचा संदेश मात्र हरवून गेला. अखेर सावनेरची तिरंगा रॅली देशभक्तीपेक्षा ‘नियमभंग’ या कारणानेच जनतेत चर्चेचा विषय ठरली.