Published On : Tue, Feb 9th, 2021

एमआयटी सरपंच संसदेच्या ग्रामविकास कार्यास सहकार्य करा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे सदस्यांना आवाहन

पुणे : एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत स्थापित सरपंच संसदेच्या ग्रामविकास उपक्रमांना सर्व विधानसभा सदस्यांनी सहकार्य करावे. असे लेखी आवाहन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

उपाध्यक्ष झिरवाळ यांनी २८८ पत्रांवर सह्या करून ते सर्व सदस्यांकडे पाठविले आहे. त्यांना पत्राच्या माध्यमातून आवाहन केले की, राजकीय क्षेत्र हे राष्ट्रनिर्माणाची सृजन प्रकिया घडवून आणण्याचे महत्वाचे साधन आहे. त्यासाठी कर्तृत्ववान युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या क्षेत्रात यावे. त्याच प्रमाणे अभ्यासपूर्वक कार्यकर्तृत्व करणे आवश्यक आहे. या दिशेने युवकांना प्रेरित करून त्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट करीत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय महिला संसद, राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि राष्ट्रीय सरपंच संसद उपक्रम ही चालविले जातात.

राज्यातील ग्रामविकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी एमआयटी सरपंच संसदेचे अभ्यासपूर्ण व निश्चित दिशा देणारे विविध उपक्रम उपयोगाचे आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व विधानसभा सदस्यांना या संसदेला सहकार्य करण्याचे आवाहन नरहरी झिरवाळ यांनी केला आहे.

एमआयटी शिक्षण संस्थासमुहाचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या विचारचिंतनातून ही सरपंच संसद आकाराला आली आहे. पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, शाश्वत ग्रामविकासासाठी त्यांचे प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपुर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करून घेणे आहे. हे या संसदेचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.