मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र या प्रकरणावर त्यांनी आता खुलासा करत पीडित कुटुंबीयांची माफी मागितली आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा गैरवापर करून माध्यमांनी ते चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं की, “मी असं म्हणालो होतो की दहशतवादी जात-धर्म विचारत नाहीत, गोळी मारतात. मात्र यावेळी विशेषतः धर्म विचारून हल्ला झाल्याचं पहिल्यांदा दिसून आलं. परंतु माझं विधान केवळ एका वाक्यात मर्यादित करून दाखवलं गेलं. संपूर्ण संदर्भ दाखवण्यात आला नाही.”
भावना दुखावल्यास क्षमायाचना –
आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मन:पूर्वक माफी मागतो, असं म्हणत वडेट्टीवार यांनी पीडित कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. त्यांनी स्पष्ट केलं की, “माझा हेतू कोणाचं दु:ख वाढवण्याचा नव्हता, तर या भयानक हल्ल्यामागे असलेल्या कटाचा आणि पाकिस्तानच्या षडयंत्राचा उल्लेख करण्याचा होता.”
सरकारवर व माध्यमांवर टीका-
वडेट्टीवारांनी यावेळी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षावरही निशाणा साधला. “देशात निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे सामान्य नागरिकांचे प्राण जात आहेत. या अपयशावर पडदा टाकण्यासाठीच विरोधी पक्षांचे विधान मुद्दाम चुकीच्या पद्धतीने सादर केली जात आहेत,” असं त्यांनी म्हटलं. माध्यमांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ न देता एकतर्फी चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट-
वडेट्टीवारांनी सांगितलं की, राहुल गांधी यांनी जो मुद्दा मांडला, तोच आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. आम्ही कोणत्याही दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभे आहोत.
देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न –
अखेर वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सांगितलं की, पाकिस्तानचा हेतू भारतात धार्मिक तेढ निर्माण करून देशात अशांतता पसरवण्याचा आहे. “हा हल्ला केवळ काही व्यक्तींवर नव्हे, तर संपूर्ण भारतावर होता. त्यामुळे एकत्र येण्याची ही वेळ आहे, एकमेकांवर टीका करण्याची नाही,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.