मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर मदत व पुनर्वसनाच्या पावलांची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने या कुटुंबीयांच्या शिक्षण, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनाची पूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जगदाळे कुटुंबीयांना विशेष मदत –
या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या मुलीची सरकारी नोकरीत तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून माझा विशेष अधिकार वापरत तिच्या भविष्यासाठी तातडीने पावलं उचलतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार –
राज्य सरकारचा हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, दहशतवादाविरोधातील राज्याची ठाम भूमिका अधोरेखित करणारा आहे. अशा प्रकारच्या क्रूर हल्ल्यांचा तीव्र निषेध करत, राज्य आणि केंद्र सरकार मिळून दहशतवादविरोधी कठोर धोरणे राबवणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.