नागपूर – नागपुरात मित्रता दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या आणि शासकीय परवानगीच्या अटींचा भंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तिघांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर मानत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणाचे सविस्तर तपशील असे की,
३ ऑगस्ट रोजी रात्री १०:४५ वाजता नागपूर-कामठी रोडवरील हॉटेल ईडन प्रिन्स येथे फ्रेंडशिप डे निमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीदरम्यान आयोजकांनी शासकीय आदेश आणि परवानगीच्या अटींचा भंग करत मोठ्या आवाजात बाजे वाजवले आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण केला.
या प्रकाराची तक्रार मिळताच जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी कारवाई करत खालील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला:
वेदांत छाबरिया, रा. नागपूर
रितेश चंद्रशेखर नदाडे, रा. वेणा नगर, दत्तवाडी, नागपूर
आकाश बनमाली सामल, रा. नागपूर
या तिघांवर (बीएनएस) अंतर्गत कलम २९३, २२१, २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(१)(W)(iii), १३१ आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली असली तरी अटींचे उल्लंघन करत गोंधळ घातला. तसेच त्यांनी कार्यक्रमासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करत अधिकृत परवानगी असल्याचा खोटा दावा केला. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जुनी कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले.