नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चार महिने उलटूनही विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
हिवाळी परीक्षांना १२० दिवस म्हणजे चार महिने उलटूनही बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., एम.ए. यासारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे निकाल लागले नाही. त्यामुळे विद्यार्थांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर यंदा विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला नियमित सुरुवात झाली आहे. मात्र, असे असतानाही विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. हिवाळी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा यंदा उशिरा घेण्यात आल्या. आता निकालही लागत नसल्याची ओरड विद्यार्थांमध्ये आहे.
विद्यापीठाने ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करावा असा नियम आहे. मात्र, असे असतानाही बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., एम.ए. अशा विषयांचे निकाल १२० दिवस उलटूनही जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान याअगोदरही असाच प्रकार घडला होता. हा विषय विधिमंडळामध्ये चर्चेला आल्यानंतरही खुद्द शिक्षण मंत्र्यांना याची दखल घ्यावी लागली होती. मात्र यंदाही तसेच घडल्याने नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.