Published On : Fri, Jul 13th, 2018

शिर्डी द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांची प्रतिमा दिसल्याने भविकांची अलोट गर्दी

Advertisement

शिर्डी : शिर्डी-द्वारकामाईत बुधवारी शेजारतीनंतर जिथे साईबाबा कायम बसायचे त्या भिंतीवर साईबाबांचा चेहरा असलेली प्रतिमा दिसत असल्याची वार्ता पसरताच मध्यरात्रीनंतर भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

गुरुवारी सकाळीही दर्शनासाठी नेहमीपेक्षा अधिक रांगा लागल्या होत्या. साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत होते. साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याचे समजताच मध्यरात्री भक्तांची गर्दी झाल्याने त्यांना आवरणे सुरक्षा विभागाच्या आटोक्याबाहेर गेले.

साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडले. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजवर या मंदिरात अनेकदा चमत्कार म्हणाव्या, अशा घटना घडल्याचे सांगितले जाते. बुधवारी मध्यरात्री गुरूवारचा शुभारंभ होताना द्वारकामाईतील कोपऱ्यात काही भाविकांना बाबांचा चेहरा दिसल्याची चर्चा सुरू झाली. हा कोपरा बाबांच्या हयातीपासून आहे. या कोपऱ्यात बाबा दिवा लावत होते. आजही या कोप-याला पुजारी रोज हार घालतात. नेमके याच ठिकाणी बाबांचे दर्शन झाल्याची चर्चा सुरू झाल्याने उत्सुकतेपोटी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. यापूर्वीही येथे सार्इंची प्रतिमा दिसल्याचे सांगितले जाते.

यानंतर काही क्षणातच द्वारकामाई परिसर भाविकांनी खचाखच भरून गेला. गर्दी नियंत्रणात आणताना सुरक्षा रक्षकांना नाकीनऊ आले. साईनामाने अवधी साईनगरी भल्या मध्यरात्री दुमदुमली होती. अनेकांनी या दृश्याचे चित्रीकरण केले. छायाचित्रे काढली. काही क्षणातच ही घटना सोशल मीडियातून व्हायरल झाली.