नागपूर : शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने विविध विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. यामध्ये रॉंग साईड वाहनचालकांवर कारवाई, ट्रिपल सीट वाहने, तसेच अल्पवयीन मुले दुचाकी किंवा चारचाकी चालविताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा समावेश आहे.
याच मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२५ रोजी वाहतूक परिमंडळ सोनेगावातील शंकरनगर चौकात पोलीस हवालदार राजेश दुबे कर्तव्यावर असताना, त्यांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दुचाकीवर एकट्याने जाताना अडवले. चौकशीत त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले. वाहन त्याच्या आईच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार मुलगा आणि वाहनधारक असलेल्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाची सुनावणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (मोटार वाहन) न्यायालयात झाली. सादर केलेली कागदपत्रे आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन मुलाला वाहन चालवू दिल्यामुळे त्याच्या आईलाच जबाबदार धरत दोषी ठरविले.
न्यायालयाने संबंधित महिलेला विविध कलमान्वये ३०,००० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, मुलगा १८ वर्ष पूर्ण करेपर्यंत त्याला वाहन चालविण्यास बंदी घालण्यात आल्याचा आदेश देण्यात आला.
हा निर्णय न्यायाधीश एम. डी. बिरहारी यांनी दिला असून, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे थांबविण्यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.