Published On : Fri, Jul 19th, 2019

समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर : समाज कल्याण विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी आज दीक्षाभूमीला भेट देवून परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेंडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले. दीक्षाभूमी स्तुपाच्या अंतर्गत स्थित भगवान गौतमबुध्द यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन सामुहिक प्रार्थना करुन अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब यांनी धर्मांतराचा क्रांतीकारी निर्णय अमलात आणला त्या बोधिवृक्षाखाली मौन बाळगून काही क्षण घालविले.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेंडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर.सुटे, सुधीर फुलझेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या स्मारक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. दीक्षाभूमी येथील सुरु असलेले विविध विकास कामे, पवित्र दीक्षाभूमी स्तूपाचे सुरु असलेले काम, परिसराचा विकास या संदर्भात समाजकल्याण राज्यमंत्री श्री. महातेकर यांनी माहिती घेतली.

दीक्षाभूमीचा विकास कामांना राज्यशासनाकडून संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्र्यांनी दिली.

प्रारंभी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, आर. एन. सुटे यांनी सत्कार केला. तसेच स्मारक समितीने विविध प्रकल्पांची माहिती दिली.

सामाजिक न्याय विभागाचा आढावा
रविभवन येथे आज राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच ॲट्रासिटी ॲक्ट व त्यातील अडचणी आदी विषयांचा आढावा घेतला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, राज्य पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष घनश्याम चिरणकर, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेश थूलकर, विदभ प्रदेश उपाध्यक्ष राजू बहादुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲट्रासिटी ॲक्टबाबत पोलिस विभागाशी चर्चा करताना राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी ॲट्रासिटी ॲक्टचा वापर आणि गैरवापर याबाबत चर्चा केली. दुर्गम भागात कायद्याच्या माहिती अभावी दुर्घटना घडत असतात. जातीय भावनेतून तेढ निर्माण होवून सामाजिक सौख्य संपुष्टात येते. यासाठी समाजात सलोख्याचे आणि बंधुत्वाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस विभागाने ॲट्रासिटी ॲक्टसंदर्भात जनजागृती निर्माण करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

लहान मुले अत्याचार पिडीत महिलांच्या संरक्षणासाठी पोलिस विभागाने कठोर भूमिका घेवून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

राज्य राखीव बलाचे उपमहानिरीक्षक महेश घुर्रिये यांनी ॲट्रासिटी ॲक्ट बाबत नागपूर विभाग दक्ष असून जिल्हधिकारी यांच्या उपस्थितीत दक्षता समितीची बैठक दरमहिन्याला घेण्यात येत असल्याबाबतची माहिती यावेळी दिली. यावेळी पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) निलेश भरणे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर विद्यार्थ्यांना प्राप्त करुन देण्यात यावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होणार नाही. जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्यांना राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी यावेळी सूचना केल्या.