Published On : Thu, May 25th, 2017

मंत्री गिरीश महाजन व भाजप आमदारांची चौकशी झालीच पाहिजे !

  • गिरीश महाजन व एकनाथ खडसेंना वेगळा न्याय कशासाठी ?
  • काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांची विचारणा

Sachin Sawant
मुंबई:
कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाईच्या लग्न समारंभाला राज्याचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे तीन-तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी आवश्यक आहे. एकनाथ खडसेंना वेगळा न्याय तर गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी ? अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना सावंत म्हणाले की, ज्या लग्नसमारोहाला भाजपचे नेते उपस्थित राहिले ते दाऊद इब्राहिमच्या अत्यंत जवळच्या नात्यातील आहेत. दाऊद इब्राहिम हा अत्यंत कुख्यात आतंकवादी असून १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात होता हे स्पष्ट आहे. या लग्न समारोहाला भाजप नेत्यांबरोबरच अनेक पोलीस अधिकारीही उपस्थित असणे हे धक्कादायक होते. यातून दाऊदचे हितसंबंध किती खोलवर रुजलेले आहेत हे दिसून येते. या लग्नसमारोहाला उपस्थित पोलीस अधिका-यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली असून याचबरोबर आयबीचीही चौकशी सुरु असल्याचे समजते. यातूनच याविषयाचे गांभीर्य लक्षात येते.

आयबीची चौकशी सुरु होणे याचा अर्थ सदर दाऊदचे नातेवाईक हे आयबीच्या रडारवर आहेत हे स्पष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन सदर नातेवाईक हा बेटींगच्या व्यवसायात अग्रगण्य असून या समारोहाला अंडरवर्ल्ड मधले अनेक गुंड, बुकी, उपस्थित होते असा संशय आहे. राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांना व पालकमंत्र्यांना यांची माहिती नसणे ही शक्यता दुरापास्त आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजप आमदारांना तरी याची माहिती निश्चित असावी असे सांगता येईल.त्यामुळे दाऊदच्या परिवाराशी आणि त्याच्याशी संबंधित कारवायांशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा काय संबंध आहे, हे स्पष्ट होणे नितांत आवश्यक आहे, असे सावंत म्हणाले.

Advertisement

याअगोदर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर दाऊदशी फोनवर संभाषण झाल्याचे आरोप झाले होते. त्यांचा राजीनामा घेण्यामागे असलेल्या अनेक कारणांमागे हेही एक कारण होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने गिरीश महाजन यांना दुसरा न्याय असे होता कामा नये, असे प्रतिपादन सावंत यांनी केले. भारतीय जनता पक्षातर्फे सातत्याने राजकारणात दाऊदच्या नावाच्या वापर केलेला आहे. दाऊद इब्राहिमला फरफटत आणू अशा वल्गना पूर्वीपासून भाजपच्या नेत्यांनी केल्या आहेत आणि आताही मोदी यांनी दाऊद इब्राहिमला खेचून आणू असे सांगितले तर होतेच. त्याचबरोबर दाऊदच्या मालमत्ता जप्त कशा केल्या याचे वर्णन भाजपाचे नेते करत असतात. परंतु दाऊदची पाळंमुळं ही जळगावपर्यत पोहचली आहेत का ? याची चौकशी झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका सावंत यांनी व्यक्त केली आणि याची चौकशी होईपर्यंत मंत्र्यांनी सत्तेबाहेर रहावे अशी मागणी केली. केंद्रात व राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणी दडपली गेली आहेत. त्यामुळे हेही प्रकरण असेच दडपले जाईल अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टर अपघातातून सुखरुप बचावले यावर सचिन सावंत यांनी समाधान व्यक्त करून त्यांना दिर्घायुष्य लाभावे अशी शुभकामना केली. या सरकारी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याची ही तीसरी घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे जेणेकरुन पुन्हा अशापद्धतीची दुर्घटना होणार नाही असेही सावंत म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement