Published On : Tue, May 1st, 2018

मनपा घेईल ‘आपली बस’मधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी : बंटी कुकडे

नागपूर: मनपाच्या परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या ‘आपली बस’ सेवेत कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याची आम्हाला काळजी आहे. त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न असो की आरोग्याचा प्रश्न असो, मनपा ते सोडविण्यास कटिबद्ध आहे. पुढील वर्षीच्या कामगार दिनापर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाचे पाऊल मनपा उचलणार आहे. शहरातील ठराविक इस्पितळात या कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार होतील. त्याचा खर्च मनपा परिवहन विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणा मनपा परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केली.

कामगार दिनाचे औचित्य साधून सभापती बंटी कुकडे यांनी शहर बसच्या हिंगणा, खापरी आणि पटवर्धन ग्राऊंड येथील डेपोला भेट दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, शहरातील ३५ लाख जनता म्हणजे नागपूर महानगरपालिकेचा परिवार आहे. या परिवाराची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. याच परिवाराकरिता ‘आपली बस’ ही सेवा मनपा देते. यात वर्षाकाठी सात कोटींचा तोटा होता. तरीही ही सेवा अविरत सुरू आहे. कर्मचारी आपल्या काही मागण्यांसाठी एक दिवस जरी ही सेवा बंद ठेवत असेल तर त्याचा त्रास परिवारातील सदस्यालाच होतो. २५ ते ३० लाखांचे नुकसान दर दिवशी होते. प्रश्न चर्चेने सुटले जातात. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत. किमान सहा ते सात महिन्यात त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

पटवर्धन ग्राऊंड डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात मनपा परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, आर.के. सिटी बस ऑपरेटर्स नागपूर प्रा.लि.चे नीलमणी गुप्ता, हंसा सिटी बस सर्व्हिसेसचे जे.पी. पारीख, डिम्सचे सी.पी. तिवारी उपस्थित होते. यावेळी श्री. पारीख आणि सी.पी. तिवारी यांनीही कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ट्रॅव्हल्स टाईम्स डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ठ चालक, वाहक, मेकॅनिक व अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कारही सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते करण्यात आला.