Published On : Tue, Mar 13th, 2018

संकटकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी “मिनी डॉक्टरची” देशाला गरज – डॉ. श्याम लड्डा

Advertisement


कोराडी : बदलती जीवनशैली, घकाधकीचे जीवन, प्रदूषण, रासायनिक खत व फवारणीपासून तयार केलेले अन्नपदार्थ, यामुळे आरोग्यविषयक तक्रारी सातत्याने वाढताना दिसत आहे. आपल्या देशातील वाढती लोकसंख्या आणि डॉक्टरांचे प्रमाण लक्षात घेता, भारतातील प्रत्येक नागरिकाला किमान वैद्यकीय ज्ञानाची/प्रशिक्षणाची गरज आहे, मिनी डॉक्टर हि संकल्पना, संकटकालीन परिस्थितीत अनेक जीव वाचविण्यात मोठा हातभार लावू शकते. एक जीव वाचविणे म्हणजे कुटुंब वाचविणे असल्याचे प्रतिपादन डॉ.श्याम लड्डा यांनी केले. महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्रात महिला दिनानिमित्त आयोजित प्रथमोपचार प्रात्यक्षिके व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

मंचावर स्त्री रोग तज्ञ डॉ.मंगला घिसाड, जीवन रक्षा चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरचे डॉ.श्याम लड्डा, उप मुख्य अभियंता अरुण वाघमारे, डॉ.संगीता बोधलकर, अधीक्षक अभियंता श्याम राठोड तर अध्यक्षस्थान कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी भूषविले.

मानवी अवयव जसे हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत, पोट, मज्जातंतू, कान, नाक, डोळे, विविध रोग, कावीळ, आम्ल, स्थूलपणा,थायरोइड, रक्तदाब, रक्तसाखर, उचकी, मुकामार, जखमा,रक्तस्त्राव, अपघात, प्राणी दंश, जळणे इत्यादींवर संकटकालीन प्रथमोपचार/उपाययोजना कशी करावी, कोणत्या गोष्टी केल्याने आपण जीव वाचवू शकतो हे वैद्यकीयदृष्ट्या समजावून सांगितले. मानवी शरीराला आवश्यक असणारे इतर पदार्थ जसे, साखर,मीठ, पाणी, तेल, व्यायाम, झोप, शाकाहार, आहार, विहार, चिंता ताणतणाव इत्यादीबाबत तपशीलवार प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ.मंगला घिसाड यांनी स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्यविषयक समस्यांचे निरसन केले. स्त्री हि स्वयंपाकघराची रांणी आहे, कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवणे स्त्रीच्या हाती असते. स्त्रियांनी फास्टफूड टाळावे,स्वत:च्या आरोग्याची विशेषत: काळजी घ्यावी असेहि त्यांनी सांगितले.


प्रशिक्षण कार्यक्रमास सुमारे २०० महिलांचा सहभाग होता. अशापद्ध्तीचे कार्यक्रम प्रत्येक अधिकारी-कर्मचारी तसेच वसाहतवासियांसाठी घ्यावेत अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थिनी मुख्य अभियंता अभय हरणे यांचेकडे व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रियंका टेंभूर्णे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्कृती रहाटे, अरुणा भेंडेकर, विद्या सोरते,सीमा शंखपाळे, प्रांजली कुबडे, प्रियंका अमृतकर, प्रसाद निकम, प्रवीण बुटे, समाधान पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.