कमी पटसंख्येच्या शाळांचे स्थलांतर केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठीच : विनोद तावडे

Vinod Tawde
नागपूर: राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा हक्क कायम राखण्यासाठीच राज्यातील ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद नाही तर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.

विधानपरिषदेत विक्रम काळे नियम ९३ अन्वये सूचना उपस्थित केली होती. या सूचनेवर बोलताना शिक्षण मंत्री श्री.तावडे यांनी स्पष्ट केले केले की, ० ते २० पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीतच घेण्यात आला होता. पण हा निर्णय आमच्या सरकारने अंमलात आणला नाही. २० पटसंख्या असलेल्या सुमारे १२ हजार शाळा तर १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ५ हजार ६०० इतकी आहे. यापैकी सर्वच नाही तर ज्या शाळांची पटसंसख्या १० पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

ज्या शाळांची पटसंख्या ४ व ५ म्हणजेच १० पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन होत नाही. तसेच त्या शाळेत क्रिडा स्पर्धा, गॅदरिंग होत नाही, त्यामुळे हा विद्यार्थी सामाजिकिकरणाच्या प्रक्रियेपासून दूर राहतो. पण कमी पटसंख्या असलेल्या शाळेपासून जवळच्या ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ६५- ७० आहे, अशा शाळांमध्ये या विदयार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांचेही समायोजन करण्यात येणार आहे. जेणे करुन कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समविष्ट होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे हित जपले जाईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

शिक्षक आमदारांनी केवळ खोटेनाटे आरोप करु नये आणि अपप्रचार करणारे लेखही छापून आणू नयेत असे स्पष्ट करतानाच श्री. तावडे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा फक्त विदयार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. गुगल मॅपच्या सहाय्याने आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन या शाळा शोधण्यात आल्या आहेत. तरीही शिक्षक आमदारांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे स्थलांतर १ कि.मी. पेक्षा अधिक दूर अंतरावर झाले असल्याचे निर्दशनास आणून दिल्यास आपण ती नक्कीच दुरुस्त करु, असेही श्री. तावडे यांनी सभागृहात आश्वासन दिले. तरीही आमच्या विभागाच्या अधिका-यासोबत शिक्षक आमदारांनी त्यांचा एक कार्यकर्ता पाठविल्यास आम्ही त्या शाळेच्या अंतराचे नक्कीच सर्वेक्षण करु असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.