
नागपूर – नंदनवन कॉलनीत बुधवारी मध्यरात्री उशिरा घडलेल्या हल्ल्याने संपूर्ण परिसर दचकला आहे. भाड्याच्या खोलीत एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी स्थितीत आढळली. मृत तरुणाची ओळख बालाजी कल्याणी अशी असून तो पोलिस भरतीसाठी तयारी करत होता.
काय घडलं मध्यरात्री?
माहितीनुसार, बालाजी आपल्या मित्रासोबत या खोलीत राहत होता. बुधवारी रात्री त्याची नातेवाईक असलेली एक मुलगी त्याला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा त्याचा मित्र शेजारच्या खोलीत झोपायला गेल्यानं खोलीत बालाजी आणि ती मुलगी दोघेच उपस्थित होते.
रात्री उशिरा स्थानिकांना तरुणी बाहेरच रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत दिसली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. नागरिकांनी तत्काळ खोलीत धाव घेतली असता बालाजी छातीत धारदार शस्त्राने भोसकलेल्या अवस्थेत निर्जीव पडलेला दिसला. तातडीने दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केलं.
प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद?
पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही घटना वैयक्तिक वादातून घडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, जखमी तरुणी वारंवार आपला जबाब बदलत असल्याने पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.
पोलीस काय सांगतात?
नंदनवन पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक कोळी म्हणाले,घटनेची माहिती मिळताच आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो. स्थानिकांनी दोघांना आधीच रुग्णालयात हलवले होते. तरुणाचा मृत्यू पोहोचण्यापूर्वीच झाला होता. तरुणीचा जबाब घेत आहोत आणि त्याची तपासणी सुरू आहे.
या रहस्यमय हल्ल्याने नंदनवन परिसरात भीतीचं आणि तर्कवितर्कांचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ल्यामागचं खरं कारण काय? खोलीत नेमकं काय घडलं? याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.









