Published On : Tue, Jun 4th, 2019

मेट्रोने गाठला महत्वाचा टप्पा; सिताबर्डी ते झिरो माईल दरम्यान मेट्रो धावली

Advertisement

नागपूर: लोकमान्य नगर आणि सुभाष नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ट्रायल रन झाल्यानंतर महा मेट्रो नागपूरने आज आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला असून आज मंगळवारी सिताबर्डी ते झिरो माईल स्टेशन दरम्यान प्रवास केला. आजच्या परीक्षणा नंतर मेट्रोने आता अप लाईन वर देखील मेट्रो ट्रेनचा प्रवास घडवून आनला.मंगळवारी मेट्रो गाडीने क्रॉस ओव्हर केले म्हणजे डाउन मार्गाने जाणाऱ्या ट्रेनने अप मार्गावर देखील प्रवास केला. पहिल्यांदाच या प्रकारचा प्रवास मेट्रो ट्रेनने केल्याने अप मार्गावरील मेट्रो ट्रेनचे आवागमन होण्याचा मार्ग सुकर झाला. अप मार्गावरील सुरु झाल्यावर मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या मध्ये वाढ होईल त्यामुळे आजचा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरला.

मंगळवारी सध्यांकाळी महा मेट्रोच्या झिरो माईल स्टेशन येथून मेट्रो ट्रेनचा प्रवास सुरु झाला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि इतर अधिकाऱ्यांनी या पूर्ण गाडीतून प्रवास केला. डाऊन लाईन वरून हा प्रवास झाला असून,झिरो माईल स्टेशन पर्यंत जात मेट्रो ट्रेनने दुसऱ्या रुळावरून म्हणजेच अपलाईन येथे प्रवास केला.

सिताबर्डी इंटरचेंज स्टेशनहून गाडी निघाली तेव्हा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना सुखद धक्का बसला. शहीद गोवारी उड्डाणपूल पार करीत मेट्रो ट्रेन पुढे गेली तेव्हा पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने थांबवत मोबाईलच्या माध्यमाने फोटो आणि व्हिडीओ घेतले. रात्रीच्या अंधारात वरून जाणारी मेट्रो त्यावेळी नागपूरकरांन करता आकर्षण आणि कौतूहुलाचा विषय ठरली.

मागच्याच आठवड्यात म्हणजे ३० मे रोजी महा मेट्रो, नागपूरने हिंगणा मार्गावर ट्रायल रन केले होते या आधी ७ मार्च रोजी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मा. पंतप्रधान यांच्या हस्ते झाले होते. लोकमान्य ते सुभाष नगर दरम्यान ट्रायल रन झाल्यानंतर अवध्या ५ दिवसांत मेट्रोने सिताबर्डी ते झिरो माईल टप्पा गाठल्याने प्रकल्पाच्या कामाची गती कायम असल्याचे स्पष्ट आहे.