नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विडिओ लिंकद्वारे दिल्ली येथून दिनांक ०७ मार्च रोजी नागपूर मेट्रोचे थाटात उदघाटन झाले असून आज शुक्रवार दिनांक ०८ मार्च रोजी महा मेट्रोतर्फे आभार दिवस साजरा करण्यात येत आहे. शहरात महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या कार्याला सुरवात झाल्यापासून नागपूरकरांनी नेहमीच महा मेट्रोच्या कार्यात सहकार्य केले आहे.
नागपूरकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी महा मेट्रोने संपूर्ण दिवसभर मेट्रोची मोफत प्रवासी सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत खापरी ते सीताबर्डी आणि सीताबर्डी ते खापरी दरम्यान नागपूरकरांना मोफत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे.
सीताबर्डी येथील मुंजेचौक इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथून सकाळी ८.०० वाजता पासून नागपूर मेट्रोच्या मोफत प्रवासी सेवेला सुरवात होणार आहे. सकाळी ३ आणि दुपारी ३ अश्या एकूण मेट्रोच्या फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
नागपूरकरांनी मोठ्याप्रमाणात आता मेट्रोने प्रवास करायला सुरवात करावी यासाठी खास या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण महिना भर नागरिकांना महा मेट्रोने जाहीर केलेल्या सवलतीच्या दरात मेट्रोने प्रवास करता येणार आहे. खापरी ते सीताबर्डी दरम्यान केवळ २० रुपए आणि एयरपोर्ट ते सीताबर्डी दरम्यान फक्त १० रुपए प्रवाश्यांना द्यावे लागतील.