Published On : Fri, Mar 19th, 2021

लसीकरणासाठी मनपा तर्फे नागरिकांना मोबाईलवर संदेश

नागपूर : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावावर नियंत्रण करण्यासाठी केन्द्र आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जास्तीत – जास्त नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. या मोहिमेला गति देण्यासाठी नागपूर महानगरपालिका तर्फे आता मोबाईल एस.एम.एस.च्या माध्यमाने ४५ ते ५९ वयोगटातील जीर्ण- व्याधि (कोम-आर्विड) नागरिकांना तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले जाणार आहे की लसीकरणासाठी तातडीने जवळच्या केन्द्रावर भेट देऊन लसीकरण करुन घ्यावे.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनपा तर्फे नागरिकांना मोबाईलवर एस.एम.एस.व्दारे संदेश पाठविले जात आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे तसेच हात वारंवार धुणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण सुध्दा आवश्यक आहे.

सध्या नागपूरात २७ शासकीय केन्द्रांमध्ये नि:शुल्क लसीकरण केले जात आहे तसेच ४५ खाजगी रुग्णालयांमध्ये शासकीय दरानुसार लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सर्व केन्द्रांमध्ये लसीकरणाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी आपले नांव ऑनलाईन नोंदणी करावे. झोनल कार्यालयामध्ये सुध्दा ऑनलाईन नोंदणी करण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण केन्द्रावर ऑनलाईन नोंदणी करणा-या नागरिकांना प्राथमिकता दिली जात आहे.