Published On : Tue, May 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

बारावीच्या परीक्षेतील मनपाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार

पुढील वर्षी शंभर टक्के यश मिळविण्याचे लक्ष्य ठेवा : मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी
Advertisement

नागपूर : बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे नावलौकीक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी (6 मे) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थांना मिळालेल्‍या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच निकालाच्या टक्केवारी लक्ष देताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकडे सुद्धा लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आज महापालिका आयुक्तांच्या सभाकक्षात करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहा. शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्री. संजय दिघोर, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णे, श्रीमती सीमा खोब्रागडे, श्री. विजय वालदे, श्रीमती अंजुमआरा, श्रीमती रजीया शाहीन, डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन करमकर, ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती माधुरी काठकर आदी उपस्थित होते.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या बारावीच्या परीक्षेत कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा 93.91 टक्के इतका लागला. १२ वीच्या परीक्षेत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे नावलौकीक करणाऱ्या विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी निर्मल कैलास माटे (79.67 टक्के) आणि द्वितीय स्थान पटाकविलेल्या नुरमुजस्सम इस्तीयाक खान (79.50 टक्के), तसेच तृतीय स्थान पटकाविलेल्या एम.ए.के आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी आयशा फातिमा मो. मुजाहिद हुसैन (74.64 टक्के) वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयातील फिझा फिझा मो. रिझवान हाश्मी (71.83 टक्के), द्वितीय स्थान पटकाविलेल्या मो. सुफियान अंसारी मो. मुस्ताक (70.83 टक्के) आणि ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी तमन्ना खान मो. रईस (64.83 टक्के) आणि कला शाखेतून प्रथम आलेल्या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयातील मुस्कान फिरदौस (81.83 टक्के), द्वितीय स्थानी असलेल्या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थींनी इकरा कौसर (80 टक्के) आणि तृतीय स्थानी अशरिना कौसर (74 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., आणि शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्याचा परिणाम बारावीच्या परीक्षेतील निकालात दिसून आला आहे. विद्यार्थ्यांना या पुढेही भरपूर मेहनत करायची आहे. करीयरच्या दृष्टीकोनातून पुढे काय करायेच हे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्याचे गरजेचे आहे. भविष्यातील करीयरकरीता समुपदेशक आणि शिक्षकांची मदत घेण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. १२ वीनंतर होणार्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात यावे, असेही त्यांनी सुचविले. महाविद्यालयाबाबत बोलताना डॉ. अभिजित चौधरी म्हणाले की, पुढील वर्षी महाविद्यायालयाचा निकाल शंभर टक्के लावण्याबरोबर मनपा महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी अधिक चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतील. गुणवत्ता यादीत येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याकरीता शाळांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शाळेचा निकाल उंचाविण्याकरीता मुख्याध्यापक, शिक्षक अधिक प्रयत्न करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

यावेळी अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., यांनीही गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील भविष्याकरीता शुभेच्छा दिल्यात. येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचा निकाल वाढविण्याकरीता अधिक प्रयत्न करणे गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी 100 टक्के निकाल लावण्याचेही त्यांनी लक्ष ठेवले.

प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम म्हणाल्या, यावर्षी 235 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत प्रवेशित होते. त्यापैकी 230 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 216 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 14 अनुर्त्तीण झाले. मनपा शाळेचा निकाल हा 93.91 टक्के लागला. यावेळी मागच्या वर्षी 81 टक्के निकाल होता जो यावर्षी 13 टक्क्याने वाढ झाली आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. पुढेही हीच परंपरा कायम ठेवून शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उप शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले. आभार शाळा निरीक्षक विनोद वालदे यांनी मानले.

Advertisement
Advertisement