Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौरांच्या हस्ते मनपाच्या शाळामधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मनपा शाळेचा 91.97 टक्के निकाल
Advertisement

नागपूर, ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षांमध्ये मनपाच्या मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता यादीतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा मनपाच्या मुख्यालयात महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड व सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.8 मे) जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नागपूर महानगरपलिकेच्या विद्यार्थांनी उंच भरारी घेतली आहे. मनपा शाळेचा निकाल हा 91.97 टक्के लागला आहे.

यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मनपातर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिक्षण समितीच्या सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुस्लीम लीगचे गट नेते श्री. असलम मुल्ला खान, नगरसेवक श्री. विनय दाणी, मंगळवारी झोन सभापती श्रीमती सीमा डवरे, नगरसेविका श्रीमती वर्षा डोंगरे, मनपाच्या उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे उपस्थित होते.

Advertisement

यावेळी बोलताना सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले, शहरातील प्रत्येकाला आपला पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून चांगले शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाला असते. ही आकांक्षा लक्षात घेऊन मनपाच्या शाळांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. सध्या मनपाची जीएम बनातवाला सह काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी ड्रा काढावा लागत आहे. यामुळे मनपाच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निश्चितपणे उपाययोजना केल्या जाईल, असेही श्री. बोरकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याची मुभा द्यावी, पालकांच्या इच्छेचा दबाव विद्यार्थ्यांवर देऊ नये, असेही श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शिक्षण समितीच्या सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी विद्यार्थ्यांना आपले पुढील शिक्षण घेण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालक अनेकवेळा अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर टाकतात. त्यामुळे पुढे अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेत आहे, हे जाणून विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षण द्यावे, असेही त्यांनी सुचविले.

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छा व मिठाईचा डबा देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे यांनी केले.

महानगरपालिकांच्या शाळांमधून पीएम श्री लाल बहादुर शास्त्री माध्यमिक शाळेची विद्यार्थींनी प्राची गुप्ता 89.20 टक्के गुणांसह तसेच एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी निखत परवीन मो. असलम हिने 89.20 टक्के गुणांसह पहिली आली आहे. तर मागासवर्गीयांमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी संस्कृती अमोल सुर्यवंशी 88.20 टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांर्थ्यामध्ये तंजीला मुस्कीने मो. फारुक अंसारी हिने 72.60 टक्के गुणासह पहिला क्रमांक पटकाविला आहे.

मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या महानगरपालिकेच्या शाळांमधून गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलीं ची संख्या अधिक आहे.

दहावीच्या शालांत परीक्षेत विद्यार्थांना मिळालेल्या यशाबद्दल महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र ( बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर यांच्यासह संपूर्ण पदाधिकारी यांनी अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांचा निकाल 87.11टक्के, तर हिंदी माध्यमाचा निकाल 89.53टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल 98.91 टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 89 टक्के लागला. शालांत परीक्षेत एकूण 972 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण 882विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी माध्यमातून पहिले तिन्ही गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी जी.एम. बनातवाला माध्यमिक शाळा या शाळेचे आहेत.

महापालिकेच्या शाळांमधून एकूण 39 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर 21 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे.

गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

मनपाच्या मराठी माध्यमातून संस्कृती अमोल सुर्यवंशी हिने 88.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर हिंदी माध्यमातून प्राची ओमप्रकाश गुप्ता हिने 89.20 टक्के गुण मिळावीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. उर्दू मध्यामातून निखत परवीन मो. असलम हिने 89.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून इफराह साहरे शेख झुलकारनैन हिने 88 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय दिव्यांगा मधून तंजीला मुस्कीन मो. फारुक असांरी हिने 72.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर संस्कृती अमोल सुर्यंवशी हिने 88.20 टक्के गुण मिळवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मनपा माध्यमनिहाय प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी

मराठी माध्यम

1. संस्कृती अमोल सुर्यवंशी – 88.20 टक्के – डॉ. राम मनोहर लोहिया मराठी माध्यमिक शाळा

2.प्रतिक्षा दिपक कोवे -87 टक्के- डॉ. राम मनोहर लोहिया मराठी माध्यमिक शाळा

3. अनुष्का अरविंद खांडेकर 84.40टक्के- जयताळा माध्यमिक शाळा

हिंदी माध्यम

1. प्राची ओमप्रकाश गुप्ता -89.20 टक्के-पीएम श्री लाल बहादुर शास्त्री माध्यमिक शाळा

2. अंकिता पिंटु गुप्ता-85.80 टक्के- सुरेंद्रगढ माध्यमिक शाळा

3.कोमल निलकंठ मंसुरे-83.80 टक्के- वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा

उर्दू माध्यम

1.निखत परवीन मो. असलम-89.20 टक्के- एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळा

2.मावीया तबस्सुम मो. इरशाद-88.80 टक्के- एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळा

3.आसमा परवीन मो. अंसारी-88 टक्के- एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळा

4.नजहत परवीन मो. साहीद 88 टक्के- एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळा

इंग्रजी माध्यम

1.इफराह साहेर शेख झुलकारनैन-88 टक्के- जी. एम. बनातवाला माध्यमिक शाळा

2.हुमारीया फिरोदस अब्दुल अलीम-85.80 टक्के -जी. एम. बनातवाला माध्यमिक शाळा

3.फरकान अहमद कलीम अहमद-83.60 टक्के -जी. एम. बनातवाला माध्यमिक शाळा

दिव्यांग विद्यार्थ्यांमधून प्रथम

तंजीला मुस्कीन मो. फारुक अंसारी -72.60 टक्के- एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम

संस्कृती अमोल सुर्यवंशी -88.20 टक्के- डॉ. राममनोहर लोहिया मराठी माध्यमिक शाळा

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.