Published On : Thu, Jul 18th, 2019

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे – उद्योगमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री रोजगारनिर्मितीकार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 1 लाख स्वयंरोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दीष्ट असून त्याद्वारे 10 लाख रोजगार निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.

राज्य शासनाच्या उद्योग विभाग आणि सीआयआयच्यावतीने चेंबूर येथील अणुशक्तिनगर येथे आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.देसाई बोलत होते.

श्री.देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांना सर्वत्र उदंड प्रतिसाद लाभत असून हजारो मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.

दरम्यान, तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराला चालना द्यावी यासाठीशासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासन सर्व आर्थिक सहाय्य करणार आहे. इच्छुकांना केवळ 10 टक्के गुंतवणूक करावी लागणार असून बँका 60 टक्के भांडवल कर्जरुपात उपलब्ध करून देणार आहेत. तर शासन तीस टक्के रक्कम देणार आहे. या कार्यक्रमाद्वारे 1 लाख छोटे-मोठे उद्योजक तयार केले जाणार असून त्याद्वारे 10 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या 36 जिल्ह्यात स्वंयरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा श्री. देसाई यांनी यावेळी केली.

येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने सुमारे साडेचार हजार मुला-मुलींनी यासाठी नोंदणी केली असून अडीच हजार जणांनी मेळाव्याला हजेरी लावली. प्रत्येक तरुणाच्या हाताला नोकरी मिळेपर्यंत शासन पाठपुरावा करणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

चेंबुरचे आमदार तुकाराम काते यांनी या मेळाव्याचे संयोजन केले. या मेळाव्यात सुमारे 80 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी केले तर आभार पी.जी. राठोड यांनी मानले.