Published On : Sat, Feb 29th, 2020

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची उद्दिष्टपूर्ती करा -रविंद्र ठाकरे

Advertisement

नागपूर: माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरिता निधीची आवश्यकता असते. यासाठी शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेवून आपल्या पगारातील निर्धारित केलेली रक्कम सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी संकलित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे ध्वजदिन 2019 निधी संकलनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट नितीन पांडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरिता ध्वजदिन निधी दरवर्षी उपलब्ध करुन दिल्या जातो. यासाठी 2019-20 या वर्षाचा राज्याचा इष्टांक 35 कोटी रुपये ठरविण्यात आला आहे. ही रक्कम निर्धारित काळात जमा करण्यासाठी शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीची रक्कम पुढील महिन्यात आपल्या पगारातून वळती करावी. यासाठी वर्ग 1 श्रेणी अधिकाऱ्यांनी 2 हजार रुपये, वर्ग 2 श्रेणी अधिकाऱ्यांनी 1 हजार रुपये, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांनी रुपये 200 तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी रुपये 50 आपल्या पगारातून ध्वजदिन निधीत येत्या आठवड्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिले.

संपूर्ण देशात 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलित करण्यात येवून शहीद सैनिकांच्या अवलंबितांच्या कुटुंबियांचे पुर्नवसन, माजी सैनिक आणि अपंग सैनिक यांच्या योग्य पुनर्वसनासाठी खर्च करण्यात येतो. या व्यतिरिक्त अन्य योजनांनुसारही सैनिकांच्या कुटुंबियांना अर्थ सहाय्य करण्यात येते.

सेवा हक्क अधिनियमानुसार शासकीय कार्यालयातील सेवांच्या माहितीबाबत जनजागृती करण्यात यावी, असे श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक शासकीय विभागाच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांबाबतची माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा. जेणेकरुन प्रशासनाची लोकाभिमुख वाटचाल होईल, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध विभागांतर्फे नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती विभागप्रमुखांकडून घेतली.