Published On : Wed, Sep 6th, 2017

ड्रॅगन पॅलेसमधील मेडिटेशन सेंटरचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

Advertisement

नागपूर: कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरातील नवनिर्मित विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असून त्यानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता ड्रॅगन पॅलेस टेंपल कामठी येथे आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त ड्रॅगन पॅलेस परिसरात करावयाच्या तयारीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, नासुप्रचे सभापती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, महावितरणचे मुख्य अभियंता, मौद्याचे उपविभागीय अधिकारी, कामठीचे तहसिलदार, कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.

या बैठकीनंतर कामठी शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत कामठी नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मजिप्राचे अधीक्षक अभियंता, महावितरण ग्रामीणचे अधीक्षक अभियंता, कामठीचे मुख्याधिकारी व अन्य अधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले आहे.