Published On : Thu, Aug 27th, 2020

नागेश सहारे यांच्या वतीने मेडिकल व मेयोला व्हील चेअर्स व स्ट्रेचर्स प्रदान

Advertisement

दिवंगत गोविंदबाबू सहारे स्मृतीनिमित्त जपले सामाजिक दायित्व

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे यांच्यातर्फे दिवंगत गोविंदबाबू सहारे स्मृतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) ला व्हील चेअर्स व स्टेचर्स प्रदान करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, अधीक्षक डॉ. सागर पांडे, डॉ. फैजल, नागेश सहारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार मोहन मते म्हणाले, आज शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे. या संकटाच्या काळात मेयो, मेडिकल आणि इतर सर्वच हॉस्पिटलचे डॉक्टर व अन्य स्टॉप दिवसरात्र सेवा देत आहेत. आज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना दवाखान्यात दाखल करताना अनेकदा व्हील चेअर्स व स्टेचर्स उपलब्ध राहत नसल्याने हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन मनपाचे आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जपलेले सामाजिक दायीत्व कौतुकास्पद आहे. समाजातील इतरही नागरिकांनी ही सामाजिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त आजची वैद्यकीय सेवेतील गरज पूर्ण करूनही आठवण जपली जाऊ शकते. हा नवा सामाजिक दायीत्वाचा पायंडा नागेश सहारे यांनी पाडला आहे, अशा शब्दांत उपमहापौर मनिषा कोठे यांनी नागेश सहारे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. आज दोन्ही शासकीय रुग्णालयात अहोरात्र सेवाकार्य सुरू आहे. संपूर्ण शहराच्या लोकसंख्येचा विचार करता दोन्ही रुग्णालयांमध्ये मूलभूत साहित्याची कमतरता दिसून येत आहे. आज या संकटात आपले रक्षण करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णांच्या सुविधेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी सुद्धा उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील दानसुर व्यक्तींनी आजची परिस्थिती लक्षात घेऊन गोरगरीब नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता शासकीय रुग्णालयांमध्ये मूलभूत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी राजू अंसारी, छोटे साहब, वलय चव्हाण, कमलेश वासनिक, ऐसान भाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.