Published On : Thu, Apr 13th, 2017

सभापती मनोज चापले यांनी घेतला मनपा दवाखान्याच्या कामकाजाचा आढावा


नागपूर
: नवीन प्रभाग पद्धतीप्रमाणे आरोग्य विभागाची पुनर्रचना कशापद्धतीने झाली आहे, सर्व प्रभागामध्ये आरोग्य विभागाची पुर्नरचना, कर्मचाऱ्यांची संख्या, वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक, कनिष्ठ स्वास्थ निरीक्षक, जमादारांची एकूण पदे यासोबतच मनपाच्या एकूण सर्व पॅथी मिळून ५१ दवाखान्यांची विस्तृत माहिती सभापती मनोज चापले यांनी आढावा बैठकीत घेतली.

गुरुवारी ( ता. १३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय सेवा आरोग्य विशेष समितीची पहिली बैठक समितीचे सभापती मनोज चापले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत उपसभापती प्रमोद कौरती, समिती सदस्य लखन येरवार, विजय चुटेले, विशाखा बान्ते, भावना लोणारे, वंदना चांदेकर आदी सदस्य उपस्थित होते. प्रारंभी समितीचे दिवंगत सभासद नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.बैठकीत सभापतींनी मनपाची एकूण मुख्य रुग्णालये, होमियोपॅथी, आर्युर्वेदिक, युनानी रुग्णालये, तात्पुरती चिकित्सालये,आंतर व बाह्य रुग्णालये, आयसोलेशन इत्यादी रुग्णालयांसोबतच या सर्व रुग्णालयात सेवा देणारे चिकित्सक, कर्मचारी,रुग्णालयाची वेळ इत्यादीबाबत विस्तृत माहिती घेतली व आवश्यक सूचना प्रदान केल्या. यावेळी स्वाईन फ्लूने बाधित रुग्णांबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीदेखिल महिती जाणून घेतली. सध्या शहरात स्वाईन फ्लूचे एकंदरीत २५ रुग्ण असून ६ रुग्ण हे विविध खासगी रुग्णालयात भर्ती आहेत. शहरातील दोन मोठी शासकीय रुग्णालये तसेच ३२ खाजगी रुग्णालयात स्वाईन फ्लूबाबत दिशानिर्देश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी बैठकीत शहरातील लहान व मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्याबाबत चर्चा पार पडली. जेसीबी, टिप्पर,सेप्टिक इत्यादी गाड्यांचे व्यवस्थापन, भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तसेच यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना, शहरातील कचरा उचलण्यात येणाऱ्या कार्यप्रणालीबाबत देखिल चर्चा घडून आली. डेंग्यू व किटकजन्य रोगाबाबत माहिती देताना मलेरिया व फायलेरिया अधिकारी जयश्री धोटे यांनी सध्या शहरात मलेरियाचा एकही रुग्ण नसून फायलेरियाचे दोन रुग्ण असल्याची माहिती दिली.

याप्रसंगी आरोग्य आधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (मेडीसीन) डॉ. अनिल चिव्हाणे, यांत्रिकी अभियंता आर.जी. गुरमुले, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, आयसोलेशन रुग्णालयाचे डॉ. एस.एस. शिंदे,रोगनिदान केंद्र महालचे डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, सदर रोगनिदान केंद्राच्या डॉ. जिचकार तसेच सर्व दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.