Published On : Mon, Apr 10th, 2017

नागपुरात MBBSच्या विद्यार्थ्याने व्हॉट्स अॅपच्या मदतीने रेल्वेत केली महिलेची प्रसुती

mmbs-student-delivers-baby
नागपूर:
तुम्ही अभिनेता आमिर खान याचा ‘थ्री इडियट्स’ हा सिनेमा पाहीला असेलच, या सिनेमात इंजिनीअरींग करणारा आमिर खान हा अडचणीच्या काळात गरोदर महिलेची प्रसुती करताना दाखविण्यात आलं आहे. असाच काहीसा प्रकार खरोखर घडला आहे आणि तोही महाराष्ट्रात. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांने चक्क व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे.

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये 24 वर्षीय चित्रलेखा ही गर्भवती महिला अहमदाबादहून ट्रेनमध्ये चढली. प्रवासादरम्यान तिला अचानक प्रसुतिवेदना सुरु झाल्या. यावेळी ट्रेन नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर होती. प्रसुतीच्या वेदना जास्तच होत असल्याने चित्रलेखाच्या नातेवाईकांनी वर्धा जंक्शनजवळ साखळी खेचून ट्रेन थांबवली. यानंतर टीसी आणि गार्डने ट्रेनमध्ये डॉक्टर शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी या गर्भवती महिलेच्या मदतीला धावून आला तो म्हणजे 24 वर्षांचा एमबीबीएसचा विद्यार्थी विपीन खडसे. विपीनने चक्क व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठांचा सल्ला घेतला आणि महिलेची सुखरुप प्रसुती केली.

सुरुवातीला मी शांत बसलो, कारण मला वाटले की एखादा डॉक्टर प्रवास करत असेल तर त्याची मदत होईल. पण ट्रेनमध्ये कुणीही डॉक्टर नव्हता त्यामुळे ते पुन्हा विचारायला आले तेव्हा मी मदत करायला तयार झालो अशी प्रतिक्रिया विपीन खडसे याने दिली आहे.

ही प्रसूती करणं अवघड होतं कारण बाळाच्या डोक्याऐवजी खांद्याकडचा भाग बाहेर आला होता. थंड पाण्याच्या बॉटल्सनी तिचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. विपीनने त्याचा फोटो व्हॉट्स अॅपवर अपलोड केला आणि डॉक्टरांची मदत घेतली. यावेळी वरिष्ठ निवासी डॉक्टर शीखा मलिक यांनी फोनवरुन मला सूचना दिल्याने ही प्रसुती सुलभ झाली असे विपीनने म्हटले आहे.

विपीनने टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना म्हटले की, “महिलेचे गर्भातले पाणी पूर्णपणे कोरडे झाले होते. रक्तस्राव होत होता, हा रक्तस्त्राव थांबण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांचा वापर करावा लागला. ट्रेनमध्ये एक सुईणीचे काम करणारी महिलाही होती, जिची मला मदत झाली. ट्रेन नागपूर स्थानकात येताच रेल्वे रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि त्यांचे पथक आले. बाळाच्या आईला औषधे देऊन त्याच ट्रेनमधून त्यांनी पूढील प्रवास केला”.