Published On : Tue, May 22nd, 2018

‘मेयोच्या’ बर्न वॉर्डमध्ये नातेवाईकांनाच काढावे लागते रुग्णांचे ‘ड्रेसिंग’

Advertisement

नागपूर: इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालय (मेयो) मधील बर्न सर्जिकल वॉर्डच्या इमारतीमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार ‘नागपूर टुडेने’ यापूर्वी प्रकाशझोतात आणला होता. हे सत्र अजूनही सुरूच असून येथील बर्न वॉर्डमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून डॉक्टर फिरकलेच नसल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांकरवी मिळाली आहे.

सोमवारी नागपूर टुडे प्रतिनिधीने मेयो हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डमध्ये भेट दिली. त्यावेळी डॉक्टर नियमितपणे तपासणीसाठी येत नसल्याचे कळले. त्याचप्रमाणे वॉर्डातील परिचारिका आणि स्टाफ रुग्णांना फक्त सलाईन आणि इंजेक्शन देतात पण त्यांचे ड्रेसिंग मात्र नातेवाईकांना काढायला लावले जात असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली. त्यामुळे तेथील परिचारिका व स्टाफ फुकटचे वेतन घेतात काय, असा संताप देखील काही रुग्णांच्या आप्तांनी व्यक्त केला. सध्या वार्डमध्ये दोन एसी आणि कुलर लावल्यामुळे रुग्णांची किमान गरमीच्या झळांपासून तरी सुटका झाली आहे. परंंतु वॉर्डसमोरील दोन्ही पुरुष व महिला प्रसाधनगृहांना कुलूप लागले आहे. सध्या बर्न वॉर्डमध्ये एकूण ८ रुग्ण आहेत. यामध्ये २ पुरुष, ५ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.

यासंदर्भात बर्न वार्डचे प्रभारी डॉक्टर विशाल नंदगवळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील प्रकाराबद्दल ‘नकारघंटा’ वाजवली. वॉर्डमध्ये तीन डॉक्टरांची रोटेशन पद्धतीने ‘ड्युटी’ लावल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामधील एक कनिष्ठ निवासी डॉक्टर(Jr1) रजेवर आहे. तसेच दुसऱ्या कनिष्ठ निवासी डॉक्टरकडे (Jr2) इतर वॉर्डचा अतिरिक्त प्रभार असल्याने ते बर्न वॉर्डमधील रुग्णांकडे संपूर्ण लक्ष देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण नंदगवळी यांनी दिले. तसेच आजपासून वॉर्डात नवीन पूर्णवेळ कनिष्ठ निवासी डॉ. गोरिले यांची नियुक्ती झाली असल्याने आता रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही अशी सारवासारव त्यांनी केली.

बर्न वॉर्डमध्ये डॉ. नंदगवळींव्यतिरिक्त दोन डॉक्टर्स असून त्यातील एक कनिष्ठ निवासी (Jr) तर एक व्याख्याता आहेत. त्यांची नावे अनुक्रमे डॉ. रोहित कुमार, डॉ. पी. नवलकर अशी आहेत.

एकूणच भर उन्हाळ्यात बर्न वॉर्ड मधील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या तब्बेतीशी खेळ चालवला असून इलाज करवून घ्यायचा असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक उघडपणे काही सांगायला तयार नाहीत. इस्पितळ प्रशासन आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे होईल का हाच सवाल आहे.

—Swapnil Bhogekar