Published On : Tue, Sep 28th, 2021

प्रभाग २७ मध्ये महापौर नेत्र व दंत तपासणी शिबिर

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २७ मधील ओमनगर येथे महापौर नेत्र व दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, शिबिराच्या आयोजक महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, देवेंद्र दस्तुरे, मनपाचे अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने ‘आझादी -७५’ अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने ७५ नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येत आहेत. तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रभाग २७मधील ओमनगर येथील हनुमान मंदिर समाज भवनमध्ये हे दोन्ही शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना नंबर देणे, मोतिबिंदू असलेल्यांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दंत शिबिरामध्ये दातांची सफाई, फिलिंग करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने विविध भागामध्ये, परिसरात वेगवेगळी आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करण्यात येत आहे. महापौर नेत्रज्योती योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढीमध्ये नि:शुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मार्च महिन्यापर्यंत शहरातील पाच हजार नागरिकांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष आहे. याशिवाय महापौर दृष्टी सुधार योजनेद्वारे तिरळेपणाची सुद्धा नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तिरळेपणामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील अशा लोकांना मनपाच्या योजनेची माहिती देउन शस्त्रक्रियेसाठी महापौर कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढी येथे रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाते शिवाय लेन्स व आवश्यक चष्मा सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याच श्रृंखलेमध्ये आता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्यामुळे दंत तपासणी शिबिराचे आयोजन होत आहेत. शिबिरामध्ये ज्या रुग्णांवर एक दिवसापेक्षा जास्त उपचार करणे आवश्यक आहे. अशांसाठी दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.