Published On : Tue, Sep 28th, 2021

ऑफिसर्स क्लबचे सर्व आर्थिक व्यवहार कॅशलेस-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Advertisement

नागपूर : ऑफिसर्स क्लबचे नियंत्रण व नियोजन विहित निर्देशानुसार होत असून या क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष हे विभागीय आयुक्त आहेत. ऑफिसर्स क्लबमध्ये असलेल्या सर्व सुविधा सशुल्क असल्यामुळे क्लबच्या सर्व सदस्यांनी तसेच नागरिकांनी आर्थिक रोख व्यवहार न करता कॅशलेस अथवा धनादेशाद्वारे व्यवहार करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा ऑफिसर्स क्लबच्या अध्यक्ष श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.

ऑफिसर्स क्लब धर्मदाय आयुक्त येथे नोंदणीकृत असून शासनाच्या निर्देशासनुसार सुरु आहे. येथे सदस्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांच्या वापरासाठी वार्षिक शुल्क आकारण्यात येते. तसेच क्लबमार्फत लॉन, बँक्वेट हॉल, उपहारगृहाची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. सदस्यांकडून क्लबसोबत थेट आर्थिक व्यवहार रोखीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे सर्व आर्थिक व्यवहार धनादेश अथवा कॅशलेस पद्धतीने करावे. रोख व्यवहार केल्यास यापुढे ऑफिसर्स क्लब जबाबदार राहणार नाही. क्लबच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात आक्षेप असल्यास व्यवस्थापनासोबत संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त यांनी केले आहे.

ऑफिसर्स क्लबमध्ये सदस्यांसाठी लॉन, बँक्वेट हॉल यासह जिम, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस यासारख्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. क्लबच्या सर्व सदस्यांनी वार्षिक वर्गणी भरुन सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.