Published On : Tue, Jul 30th, 2019

‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे येत्या ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान ‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा तीन गटात होणार असून पहिल्या गटात इयत्ता ९वी ते १०वी, दुस-या गटात इयत्ता ६वी ते ८वी व तिस-या गटात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश नि:शुल्क असून स्पर्धेची प्राथमिक फेरी झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात होईल.

इयत्ता ९वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक एकची प्राथमिक फेरी ९ ऑगस्टला तर इयत्ता ६वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरी १० ऑगस्ट आणि इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीतील स्पर्धा १३ ऑगस्टला होणार आहे. तिन्ही गटातील स्पर्धा सकाळी ९ वाजता होईल. स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्टला सकाळी ९ वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह पार पडेल.

स्पर्धेमध्ये सहभागी गटामध्ये एकूण १० ते १५ विद्यार्थ्यांसह वाद्यवृंदाचा समावेश असावा, वाद्यवृंद संघात विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेउ इच्छिणा-या शाळांनी ६ ऑगस्टपर्यंत मनपा मुख्यालयातील क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्र सादर करावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी मनपा मुख्यालयातील क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा.