नागपूर: जागतिक योग दिनानिमित्त २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी वेळेच्या आत पूर्ण करा. कुठलीही कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या. आयोजन संस्मरणीय ठरावे यादृष्टीने सर्व संबंधितांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्यरितीने पार पाडा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
जागतिक योग दिनाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांनी बुधवार ता. १४ जून रोजी सकाळी यशवंत स्टेडियमची पाहणी केली. याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी सदर निर्देश दिले. यावेळी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. विजय जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, क्रीडा विभागाचे नरेश चौधरी, पोलिस विभागातर्फे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सरोदे आदी उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार यांनी कार्यक्रम आयोजनातील सर्व व्यवस्थांचा आढावा स्टेडियमवर घेतला. व्यासपीठ कसे राहील, पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, योग दिनाकरिता येणाऱ्या नागरिकांना ज्या द्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे, त्या द्वारांची पाहणी केली. कार्यक्रमाच्या आधी संपूर्ण स्टेडियमच्या आतील आणि बाहेरील परिसरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमानंतर स्टेडियम तातडीने स्वच्छ करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. योगदिनाची माहिती नागपुरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यमांची मदत कशा प्रकारे घेता येईल, इतर माध्यमांना यात कशा प्रकारे सामावून घेता येईल, याबाबतही त्यांनी चर्चा केली.
योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कशी राहील, याबाबत सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सरोदे यांनी माहिती दिली. एकंदरच संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कुठलीही अव्यवस्था होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित योग दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले.
