Published On : Wed, Apr 14th, 2021

रासेयोच्या विद्यार्थ्यांना देणार अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण : महापौर

Advertisement

अग्निशमन सेवा दिवसानिमित्त महापौर-आयुक्तांनी वाहिली शहिदांना आदरांजली

नागपूर : आगीच्या घटनांमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावे अग्निशमन महाविद्यालय सुरू करणारी नागपूर महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका आहे. आता रातुम नागपूर विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढील १५ दिवसांत सुरू करण्याचा मानस महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

अग्निशमन दलामध्ये कर्तव्यावर असताना जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचविताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन दिवस तर १४ ते २१ एप्रिलदरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. यानिमित्त कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी महापौर बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, रासेयोच्या विद्यार्थ्यांना अग्निशमन सुरक्षेचे प्रशिक्षण आजपासूनच सुरू करण्यात येणार होते. मात्र काही अडचणींमुळे पुढील १५ दिवसांत या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर मनपाअंतर्गत असलेल्या अग्निशमन सेवेतील जे जवान कर्तव्यादरम्यान शहीद झाले, त्यांच्या कुटुंबांतील सदस्याला नोकरी आणि आर्थिक मदत दिली. परंतु त्यांच्या स्मृति कायम राहाव्या यासाठी शहीदांच्या नावानेच मनपाने अग्निशमन महाविद्यालय सुरू केले. त्यातून अनेकांनी प्रशिक्षण प्राप्त केले असून आता रासेयोच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी., अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती दीपक चौधरी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, प्रभारी उपायुक्त महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, केंद्राधिकारी तुषार बाराहाते, स्थानाधिकारी राजेंद्र दुबे, मोहन गुडधे आदी उपस्थित होते.

महापौर आणि आयुक्तांनी शहिदांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली. अन्य अधिकाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीदांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला अग्निशमन विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.