Published On : Wed, Sep 4th, 2019

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीबाबत महापौरांनी घेतला आढावा

Advertisement

प्रत्येक काम जबाबदारीने करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार (ता.७) ला विविध विकास कामाचे उदघाटनासाठी शहरात येत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेद्वारे तयारी जोमाने सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी (ता.४) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीमध्ये घेतला.

यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, राजेंद्र रहाटे, अविनाश बाराहाते, श्री.ए.एस.बोदिले, ए.एस.मानकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रकाश वराडे, गणेश राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाद्वारे काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांनी शहराला स्मार्ट सिटी म्हणून वेगळी ओळख लाभली आहे. त्यांच्या विशेष पुढाकाराने माननीय पंतप्रधान विविध विकास कामांचे लोकार्पण/उदघाटनासाठी नागपूरला भेट देत आहेत. त्यामुळे केवळ मा.पंतप्रधानाचे दौ-याचे मार्गातीलच नव्हे तर संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी त्यांना नेमून दिलेली कामे जबाबदारी कर्तव्यभावनेतून पार पाडावी तसेच नागरिकांनी सुध्दा हे माझे शहर आहे या भावनेतून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

अग्निशमन विभागामार्फत विमानतळ, राजभवन, मानकापूर स्टेडियम, सुभाषनगर, मुंजे चौक याठिकाणी प्रत्येकी एक गाडी असणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाद्वारे देण्यात आली. या सर्व गाड्या तपासून अद्ययावत करणे व त्या सुस्थितीत असेल याची खातरजमा करावी तसेच संबंधित विभागाशी संपर्क करुन आवश्यकतेनुसार अग्निशमन वाहने उपलब्ध करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

शहराचे रस्त्यावर पाणी कुठे साचते आहे, ते आजच तपासून बघावे. पाण्याचा निचरा कसा होईल, हे देखील बघावे व त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मार्गातील रस्त्यावर व अन्य मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे आहे. ते तातडीने बुजविण्यात यावे, त्याची यादी कार्यकारी अभियंत्यानी करून ते काम त्वरित मार्गी लावावे, असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या. स्वच्छतेबाबत कुठलिही हयगय करता कामा नये. शहराची स्वच्छता करावी, कुठेही कचरा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याव्यतिरिक्त मोकाट जनावरांसाठी आजच कोंडवाडा विभागाची गाडी फिरवून जनावरांची व्यवस्था करण्यात यावी, मार्गात कुठेही जनावरांचा अडथळा येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

प्रारंभी आयुक्त अभिजित बांगर यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याचा मार्ग व दौऱ्याविषयी माहिती दिली. मार्गातील रस्ता दुभाजकावर तातडीने रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. याशिवाय विकासकामांमुळे फुटपाथांची दुरावस्था झाली आहे. त्याची देखील डागडुजी तातडीने करून रंगरंगोटी तसेच दिशादर्शक फलकाची दुरूस्ती तातडीने करावी, मार्गात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहे, आवश्यक त्या फांद्या छाटण्यात याव्यात, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. मार्गातील विद्रुपीकरण करणारे सर्व जाहिराती तातडीने काढून घ्यावे, असेही आयुक्तांनी सांगितले. मार्गातील सर्व सिग्नल्स दौऱ्यादरम्यान सुरू ठेवावे आणि सिग्नल्सची रंगरंगोटी करण्यात यावी, असेही आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

याव्यतिरिक्त मेट्रो रेल्वेशी संपर्क साधून त्यांना आवश्यक असेल त्या गोष्टींची पूर्तता करण्यात यावी. पंतप्रधानांचा दौरा हे आपलेच कार्य आहे, असे समजून सर्वांनी काम करावे, असे महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या. मानकापूर स्टेडियम येथे आवश्यक त्या प्राथमिक सेवा मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुरविण्यात याव्यात, असेही महापौर नंदा जिचकार निर्देशित केले.