Published On : Tue, Mar 23rd, 2021

‘नो मास्क नो एन्ट्री’ पोस्टरचे महापौरांच्या हस्ते विमोचन

Advertisement

व्यापारी प्रतिष्ठानांसाठी श्रीकांत चारी यांचा उपक्रम

नागपूर : कुठलीही जनजागृती नागरिकांच्या सहभागाशिवाय प्रभावी ठरत नाही. याच भावनेतून नागपुरातील नागरिक श्रीकांत चारी यांनी ‘नो मास्क नो एन्ट्री’ या संदेशाचे फलक शहरातील प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानांवर लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या फलकाचे विमोचन मंगळवारी (ता. २३) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिका ही नागपूर शहराची पालक संस्था आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासोबतच नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठीही महापालिका प्रयत्नरत असते. कोरोनाचा काळ हा नागरिकांसोबतच नागपूर महानगरपालिकेसाठी परिक्षेचा काळ होता. या काळात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मनपाचे प्रयत्न आजही सुरू आहेत. यात जर नागरिकांची सोबत असेल तर कोरोनाविरुद्धची लढाई एकत्र जिंकता येऊ शकते.

श्रीकांत चारी यांच्यासारख्या व्यक्तीने पुढाकार घेऊन जनजागृतीसाठी केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे. संत्रा जर चांगला राहायचा असेल तर त्यावरही कवच असणे आवश्यक आहे. हीच संकल्पना त्यांनी जारी केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानांवर हे फलक लागावे हा त्यांचा आणि मनपाचाही मानस आहे. अशा जनजागृतीसाठी प्रत्येक नागरिकाने समोर यावे. व्यापाऱ्यांनी मास्क घातल्याशिवाय कुठल्याही ग्राहकाला दुकानात येऊ देऊ नये आणि नागरिकांनीही ही आपली जबाबदारी समजून त्याचे पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.