Published On : Wed, Nov 28th, 2018

विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढविण्यात विज्ञान मेळावा पथदर्शी ठरावा : महापौर नंदा जिचकार

अपूर्व विज्ञान मेळाव्याचे थाटात उद्‌घाटन

नागपूर: विद्यार्थ्यांची विज्ञानामध्ये रुची वाढावी, त्यांची विज्ञानाशी मैत्री व्‍हावी व हसत खेळत विज्ञानाची अनुभूती घेता यावी यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा पथदर्शी ठरावा, असा अपेक्षा महापौर नंदा जिचकार यांनी व्‍यक्त केली.

नागपुरातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या ‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले. उद्‌घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरेसविका उज्ज्वला शर्मा, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार विज्ञान मेळाव्याचे समन्वयक ज्योती मेडपीलवार, कपिलनगर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर यांची उपस्थिती होती.

नागपूर महानगरपालिका व असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार समिती येथे आयोजित या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व प्रयोगांची माहिती घेत महापौरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

फीत कापून उद्‌घाटन केल्यानंतर महापौर नंदा जिचकार आणि अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व प्रयोगांच्या स्टॉल्सला भेट दिली. कुतुहलाने त्यांनी सर्व प्रयोगांविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शाबासकी देत त्यांच्यातील कुशाग्र बुद्धीचे कौतुक केले.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी बोलताना, विद्यार्थ्यांची विज्ञानाबाबात रूची वाढवी याकरिता यासारखे विज्ञान मेळावे हे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विज्ञानाचे रोज जीवनात होणारा वापर किंवा विज्ञान हे प्रयोगाद्वारे शिकणारा विषय आहे.

रोजच्या व्यवहार जीवनातील विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेतले तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान हा अपूर्व विज्ञान मेळावा उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व विज्ञानप्रेमींनी या विज्ञान मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.