Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Sep 16th, 2019

  महापौर नंदा जिचकार यांची ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने घेतली दखल

  ‘बदलत्या वातावरणाचे परिणाम आणि उपाय’ यावर मुलाखत

  नागपूर : जगभरातील बदलते वातावरण, त्याचे परिणाम आणि उपाय’ यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शहरातील महापौरांचा समावेश असलेल्या ग्लोबल कोवेनट ऑफ मेयर्स (जिका) एक चळवळ सुरू केली आहे. यामाध्यमातून परिणामांवर चर्चा आणि उपायांचा आराखडा तयार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या चळवळीची ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दखल घेतली आहे. जिकॉमच्या सदस्य असलेल्या नंदा जिचकार यांच्यासह अन्य सदस्यांच्या विषयाशी संबंधित मुलाखती प्रकाशित करून एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.

  ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रकाशित केल्यानुसार, आयपीसीसीने सन २०१८ रोजी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सन २०४० मध्ये ग्लोबल वॉर्मिंग १.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचेल. ही भीती लक्षात घेता अनेक राष्ट्रांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून ग्लोबल वार्मिंगची भयावहता टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. जगातील २४ देश आणि युरोपियन युनियनने एकत्र येऊन क्लिन एनर्जी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन इनोव्हेशन’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये नुकतेच ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर भागीदार झाले आहे.

  ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर जगभरातील १० हजार शहरांशी जुळले असून क्लिन एनर्जी निर्माण करण्याच्या दृष्टीने संशोधन करीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समूहाने एकत्र येऊन एखाद्या जागतिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ही पहिलीचे वेळ असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने विशेषत्वाने नमूद केले आहे.

  हे सांगतानाच ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्सचे सदस्य असलेल्या दक्षिण आशियातील एकमेव प्रतिनिधी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह इंडोनेशियातील सुराबया शहराच्या महापौर ट्राय रिसमहारिनी, घानातील एकारा शहराचे महापौर मोहम्मद अदजई सोव्हा, कॅनडातील एडमॉन्टन येथील महापौर डॉन इव्हेसन, केनित्राचे महापौर अझीझ रब्बाह, युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष मारोस सेफकोविक, इंग्लडचे माजी मंत्री क्रिस स्किडमोर यांच्या मुलाखती घेत त्यांच्या शहरात बदलत्या वातावरणाचे परिणाम टाळण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यावर मुलाखती घेऊन प्रकाशित केल्या आहेत.

  खासगी क्षेत्रासोबत विकास करताना नावीन्यपूर्ण काय धोरण आखले आहे, या प्रश्नाच्या उत्तरात महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले की, नागपुरात अनेक प्रकल्प पीपीपी तत्त्वावर यशस्वीरीत्या सुरू आहेत. नागपूर शहराने पारंपरिक वीज दिवे एलईडीमध्ये परावर्तीत करीत ऊर्जा बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सुमारे एक लाख १० हजार पथदिवे एलईडीमध्ये परावर्तीत करीत ४० टक्के ऊर्जेची बचत सुरू केली आहे. कमी ऊर्जा बिलांमधून उत्पन्न झालेल्या बचतीद्वारे अर्थसहाय्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

  ‘मिशन इनोव्हेशन’मध्ये समाविष्ट राष्ट्राच्या सरकारने स्वच्छ ऊर्जेवर त्यांचे संशोधन व विकासासाठी असलेली गुंतवणूक दुप्पट करण्याचे वचन दिले आहे. शहराच्या वातावरणात बदल होण्याच्या दृष्टीने ते कसे निर्देशित केले जाऊ शकते, यावर बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, सन २०१४ ते २०५० या कालावधीत भारताच्या शहरी लोकसंख्येमध्ये ४०० दशलक्ष वाढ होण्याची शक्यता आहे. अशा जलद शहरीकरणामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि अर्थातच पर्यावरणीयदृष्ट्या मोठा ताण निर्माण होता. या आव्हानांना तोंड देण्यासाठी नागपूरने स्मार्ट सिटीमध्ये गुंतवणूक केली आहे. नागपूर हे सध्या भारतातील प्रथम क्रमांकाचे स्मार्ट शहर आहे. हे अभियान स्वाभाविकपणे हवामान बदलाच्या विरुद्ध लढ्याशी जोडलेले आहे. स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञानात संशोधन आणि विकास करण्याकरिता वाढलेली गुंतवणूक आपल्या शहरांना अधिक शाश्वत बनवू शकेल, असेही त्या मुलाखतीदरम्यान बोलल्या.

  ग्लोबल वार्मिंग विषयावर जागतिक स्तरावर ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने जिकॉमच्या माध्यमातून नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांना दिलेली प्रसिद्धी ही नागपूर विकासाची ग्वाही देणारी आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145