Published On : Fri, Mar 9th, 2018

महापौर नंदा जिचकार यांनी घेतला शोभायात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा


नागपूर: दरवर्षी रामनवमीच्या दिवशी शहरात दोन भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्यासंबंधीचा प्रशासनिक पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात घेतला. यावेळी माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी, पोद्धारेश्वर राम मंदिराचे पुनीत पोद्दार, विश्वस्त श्रीकांत आगलावे प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात विविध ठिकाणी सीमेंट रस्त्यांचे कामे सुरू आहे. दोन रस्त्यांमध्ये असलेल्या भागात खड्डे तयार झाले आहे. त्यामुळे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. हंसापुरी आणि जुना भंडारा रोड येथे एसएनडीएलद्वारे लावण्यात आलेले विजेचे तार खाली आले आहे. शोभायात्रेतील चित्ररथांना त्या तारांचा अडथळा होऊ शकतो. एसएनडीएल सोबत संपर्क साधून विजेच्या तारांना योग्यप्रकारे लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शोभायात्रेच्या मार्गावरील रस्त्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्या, असे आदेश महापौरांनी दिले. शोभायात्रा संध्याकाळी ज्या मार्गातून मार्गक्रमण करते, त्या मार्गावर अंधार पडु नये, याकरिता अतिरिक्त दिवे लावण्यात यावे, असेही निर्देश महापौरांनी कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल यांनी दिले.

यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी जलप्रदाय विभागाद्वारे केलेल्या तयारीचा आढावा घेतला. जलप्रदाय विभागाद्वारे ज्या ठिकाणी पाण्याचे स्टॉल लावणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना पाण्याची व्यवस्था करून देणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड यांनी दिली. शहीद चौकात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे जुना भंडारा रोड येथून शोभायात्रा आल्यावर शहीद चौकातून वळण घेण्यास त्रास होतो. त्यामुळे अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. स्वच्छ सर्वेक्षण शहरात सुरू आहे. शोभायात्रेदरम्यान कचरा होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याकरीता स्वयंसेवकाची चमू शोभायात्रेत राहणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

पश्चिम नागपूर मधून निघण्याऱ्या शोभायात्रेचा आढावा यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. बैठकीला उपअभियंता शकील नियाजी, परिवहन विभागाचे योगेश लुंगे, गांधीबाग झोन सहायक आय़ुक्त अशोक पाटील, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते.