Published On : Mon, Sep 9th, 2019

महापौरांनी केली गणेश विसर्जनस्थळांची पाहणी

Advertisement

नागपूर: शहरातील तलावांचे सौदर्यं अबाधित राहावे आणि पर्यावरणाचे संतुलन टिकता यावे याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सर्व तलावाजवळ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व विसर्जनस्थळांची पाहणी सोमवारी महापौर नंदा जिचकार आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवरांनी सर्वप्रथम सोनेगाव तलाव विसर्जनस्थळाची पाहणी केली. सोनेगाव तलवालगत दोन कृत्रिम तलाव, जयप्रकाशनगर येथे एका कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळालगत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते त्याठिकाणी भराव टाकून तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. कृत्रिम तलावाची पाहणी करताना ते व्यवस्थित आहे की नाही, हेही तपासून बघावे, अशा सूचनादेखील यावेळी महापौरांनी दिल्या. सोनेगाव तलाव येथे लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्र.कार्यकारी अभियंता धनंजय मेंडूलकर उपस्थित होते. यानंतर मान्यवरांनी सक्करदरा तलाव येथील विसर्जनस्थळाची पाहणी केली. सक्करदरा तलावाला संरक्षण कठडे लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. याठिकाणी नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्नेहा करपे उपस्थित होते.

यानंतर गांधीसागर तलाव विसर्जनस्थळाची पाहणी मान्यवरांनी केली. गांधीसागर तलाव सभोवताल १५ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी धंतोली झोनच्या सभापती लता काडगाये आणि सहायक आयुक्त किरण बडगे प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर लेंडी तलावाची पाहणी केली. अंबाझरी तलावाजवळ ५ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. फुटाळा तलाव येथे एकूण ९ कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी उपस्थित होते.

तलावाचे सौंदर्य अबाधित राहील याची दक्षता घ्यावी. घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.