पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना उन्हाचे ‘चटके’, हॉस्पिटल प्रशासन मात्र एसीच्या ‘थंड’ झोपेत

नागपूर: शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक उपचार केंद्रांची दुरवस्था आणि तेथील प्रशासनाची अनास्था कुणापासून लपलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये (मेयो) नेमकी काय परिस्थिती आहे, हे तपासण्यासाठी ‘नागपूर टुडे’ प्रतिनिधीने तेथे भेट दिली. तेव्हा अनेक बाबींचा उलगडा झाला. सदर परिस्थिती एका ‘वृत्त-मालिकेच्या’ माध्यमातून आपल्यासमोर रोज येणार आहे.

तर ‘मेयो’ मध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे, हे आज आपण जाणून घेऊ. याचसंदर्भात माहिती घेण्यासाठी बुधवारी ‘नागपूर टुडे’ प्रतिनिधीने शल्यचिकित्सा विभागात ( सर्जिकल वॉर्ड ) भेट दिली. या विभागात अस्थिरोग (ऑर्थोपेडिक), कान-नाक-घसारोग, नेत्ररोग (आय) आणि जळीत रुग्ण (बर्न) उपचार कक्ष आहेत. येथे पाहणी केली असता तळमजल्यापासून ते वरच्या मजल्यावर दोन-तीन वॉटर कुलर वगळता इतर ‘R.O. वॉटर कुलर’ बंद (नादुरुस्त) अवस्थेत आढळले. एका वॉटर कुलरच्या नळाखालच्या प्लेटमध्ये तर अन्नाचे कण अडकल्याने तेथे पाणी भरून वाहत होते. परंतु सफाई कर्मचारी किंवा गार्ड्सना कोणाचेही तिकडे लक्ष नव्हते. या सगळ्यामुळे भर उन्हाळ्यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याकरीता थेट वॉर्डाच्या बाहेर निघून काही अंतरावर चालत जावे लागते.

रुग्णाच्या नातेवाईकांशी याबाबतीत संवाद साधला असता एका वृद्धाने सांगितले की, “केवळ पेशन्टला पाणी वेळेवर मिळावे म्हणून आम्ही दोघेजण हॉस्पिटलमध्ये थांबलो आहोत”. तर एकाने सांगितले की, वॉर्डातील चालू असलेल्या वॉटर कुलरचे पाणी ‘पिण्यायोग्यच’ नाही. हॉस्पिटलमधल्या पाण्याच्या टाक्या आणि वॉटर कुलर अनेक महिने स्वच्छच केले जात नाहीत असे देखील कळाले. त्यामुळे हॉस्पिटल वॉर्डच्या बाहेरील परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी खाजगी सेवाभावी संस्थांकडून थंड ‘पाणी-प्याऊ’ सुरु करण्यात आले आहेत. या ‘प्याऊ’ केंद्रांमुळे रुग्ण आणि त्यांच्या आप्तांना मोठा आधार मिळाला आहे.

Drinking Water Cooler in Mayo Hospital
सर्जिकल वॉर्डच्या समोरील भागात दीनदयाल थाली केंद्राच्या बाजूला ‘अग्रवाल’ यांच्या संस्थेकडून ‘आर.ओ. वॉटर कुलर’ लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘ओपीडी’ विभागाच्या समोर अनाम व्यक्तीकडून थंड पाण्याच्या कॅन्स दररोज भरून ठेवल्या जातात. तसेच मेयोच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच डाव्या हाताला मामीडवार यांच्या संस्थेमार्फत थंड पाणपोयीची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे तीन-चार रांजणांमध्ये पाणी भरून ठेवले जाते. ते पाणी थंड झाले की, तेथेच ठेवलेल्या कॅन्स मध्ये भरले जाते. येथून अनेक लोक बाटल्यांमध्ये, भांड्यांमध्ये, गुंडांमध्ये पाणी भरून नेत असल्याचे लगतच असलेल्या एटीएमच्या सुरक्षारक्षकाने सांगितले.

खरे पाहता मेयोमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्याची जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाची आहे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र याच्या अगदी विपरीत आहे. त्यामुळे आतातरी पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाचे चटके सोसणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटल प्रशासन एसीच्या ‘थंड’ झोपेतून जागे होईल का ?


Drinking Water Cooler in Mayo Hospital

—Swapnil Bhogekar