Published On : Fri, Apr 20th, 2018

“स्वच्छ, सुविधायुक्त, रुग्ण-दक्ष हॉस्पिटल” नागरिकांचा हक्क नाही काय ?

Advertisement

Toilets in Mayo Hospital, Nagpur

नागपूर: कालच्या भागात आपण पाहिले की, ‘मेयो’ हॉस्पिटलमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कशी वणवण करावी लागते. आता हॉस्पिटलमधील प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची स्थिती काय आहे, हे पाहूया.

मेयोच्या शल्यचिकित्सा विभागात ( सर्जिकल वॉर्ड ) बुधवारी ‘नागपूर टुडे प्रतिनिधीने’ भेट दिल्यानंतर तेथील स्वच्छतेचा ‘साफ’ बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आले. वॉर्डाचा संपूर्ण फेरफटका मारल्यानंतर देखील तेथे कुणीही सफाई कामगार आढळला नाही. त्याबद्दल चौकशी केली असता कळले की, वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी काम सोडून जातात. तीन महिन्यांचे वेतन थकल्याने नुकतेच दोन सफाई कामगारांनी काम सोडल्याची माहिती सुद्धा मिळाली.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे अस्थिरोग (ऑर्थोपेडिक), कान-नाक-घसा ( ईएनटी ) व जळीत (बर्न) रुग्ण उपचार कक्षाच्या परिसरातील प्रसाधनगृहे अतिशय गलिच्छ अवस्थेत आढळली. कुठे पाणी साचलेले, तर कुठे बेसिनचे पाईप निघालेले, कुठे पान-खर्ऱ्याचे पिंक टाकलेले आणि कुठे धुळ व घाणीचे साम्राज्य साचल्याचे चित्र होते. तसेच आश्चर्य म्हणजे बहुतेक मजल्यांवरील प्रसाधनगृहांना कुलूप लागलेले होते. अपवाद वगळता सर्जिकल वॉर्डातील सर्व महिला प्रसाधनगृहे देखील बंदच होती. त्यामुळे ‘राईट टू पी’ साठी महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची (महिला) शोधयात्रा सुरु होती. ईएनटी कक्षाबाहेर एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले की, डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सगळे सदर कक्षाच्या आत असलेल्या एकाच प्रसाधनगृहाचा वापर करतात.

Toilets in Mayo Hospital, Nagpur

त्याचप्रमाणे जळीत (बर्न) रुग्ण कक्षाजवळ लावलेले २ कुलर वगळता सर्जिकल वॉर्डातील इतर कोणत्याही कक्षाबाहेर कुलर लागलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या आप्तांना उन्हाचा ताप सहन करीत फॅनच्या गरम हवेत बसण्याशिवाय काहीही पर्याय नाही. उपचारासाठी अनेक जण महाराष्ट्राच्या कान कोपऱ्यातून तसेच काही लोक शेजारच्या राज्यातून देखील हॉस्पिटलमध्ये येतात. ते इस्पितळातच मुक्काम करत असल्याने ऐन उन्हाळ्यात त्यांची फार गैरसोय होत आहे. येथे लिफ्टची देखील समस्या आहे. सर्जिकल वॉर्डातील फक्त एका बाजूचे दोन उद्वाहक (लिफ्ट) सुरु होते. मात्र इमारतीच्या मध्यभागी दिव्यांग आणि वृद्ध रुग्णांची ने-आण करण्यासाठी असलेली ‘स्ट्रेचर’ लिफ्ट बंद होती.

Toilets in Mayo Hospital, Nagpur

सर्जिकल वॉर्डात प्रत्येक उपचार कक्षातील औषधी व उपचार साहित्याचा कचरा गोळा करण्यासाठी आणि तातडीच्या वेळी रुग्णांना संबंधित कक्षात पोहोचवण्यासाठी ३ बॅटरी-रिक्षाची ( ई-रिक्षा ) सोय आहे. परंतु यातील एक ई-रिक्षा मात्र टायर पंक्चर झाल्याने बंद होता. त्यासंबंधी तळमळजल्यावर मागच्या प्रवेशद्वारावर तैनात ‘एमएसएफ’च्या सुरक्षा गार्डला विचारल्यावर त्याने गोलमोल उत्तर देत ही रिक्षा आजच नादुरुस्त झाल्याचे सांगितले.

एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत अभियानाचा’ हायटेक प्रचाराद्वारे बागुलबुवा करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या शहरातील अग्रणी शासकीय रुग्णालयाची (मेयो) ही अवस्था आहे. तसेच चांगल्या सुविधा पुरवण्याच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. उपचारांची गरज आणि त्यातून आलेली असहाय्यता आणि तक्रार न करण्याची वृत्ती हॉस्पिटल प्रशासन व कर्मचाऱ्यांसाठी जमेची बाजू ठरली आहे. ‘स्वच्छ भारत’ प्रमाणेच ‘स्वच्छ व रुग्ण-दक्ष इस्पितळ’ अशी मोहीम राबवण्याची गरज हॉस्पिटल प्रशासन आणि मायबाप सरकारला आतातरी भासणार काय ?

Toilets in Mayo Hospital, Nagpur

Mayo Hospital, Nagpur

E-Rickshaw in Mayo Hospital, Nagpur

Mayo Hospital, Nagpur

Mayo Hospital, Nagpur

—Swapnil Bhogekar

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement